धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये थरार; लग्न केल्याचा राग; गुंडांकरवी बहिणीसह पतीला मारहाण | पुढारी

धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये थरार; लग्न केल्याचा राग; गुंडांकरवी बहिणीसह पतीला मारहाण

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  ड्रायव्हरशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून सुपारीबाज गुंड पाठवून भावाने बहिणीसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक ते कल्याणदरम्यान धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. राधेश्याम चौधरी, इम्तियाज यासिन, आशिष कुमार प्रसाद, उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद आणि अनुप चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपींची नावे आहेत.

उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात राहणार्‍या खुदिराम चौधरी याने अनुष्का वर्मा नावाच्या तरुणीसोबत सप्टेंबर 2023 मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र याबाबत कुणालाच सांगितले नाही. 25 एप्रिल रोजी अनुष्का घरातून बेपत्ता झाली. अनुष्काच्या नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. अनुष्का पती खुदिराम याच्यासोबत झाशीला गेली. तेथून तिने कल्याणला जाण्यासाठी गोरखपूर एक्स्प्रेस पकडल्याचे कळताच अनुष्काच्या नातेवाइकांनी नाशिक आणि मुंबईत राहणार्‍या नातेवाइकांना माहिती दिली. एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहोचताच काही तरुण एक्स्प्रेसमध्ये घुसले.

एक्स्प्रेसमध्ये अनुष्काचा फोटो एक तरुण मोबाईलद्वारे काढत असताना खुदिरामने पाहिले. या कारणावरून खुदिराम आणि फोटो काढणार्‍या तरुणामध्ये वाद झाला. तोपर्यंत ही एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली होती. या टोळक्याने खुदिराम आणि अनुष्का या दोघांना घेरले. अनुष्काला खेचून या टोळक्याने खुदिरामला मारहाण सुरू केली. पोलिसांनी या टोळक्याला पकडले.

चौकशी केली असता खुदिराम हा ड्रायव्हर असून अनुष्का ही संपन्न घरातील असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. अनुष्काच्या घरातल्यांचा या लग्नाला विरोध होता. तरीही अनुष्काने खुदिराम याच्याशी लग्न केले. मात्र ड्रायव्हरशी लग्न केल्याच्या रागातून अनुष्काच्या भावाने गुंडांना पाठवले. या हल्लेखोरांनी खुदिरामला मारहाण करून बहीण अनुष्काला पुन्हा घरी पाठव, अशी धमकी दिल्याचे चौकशीदरम्यान समोर आले

Back to top button