Lok Sabha Election 2024 : भाजपमधील 'महाजनपर्व' अखेर संपणार! | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपमधील 'महाजनपर्व' अखेर संपणार!

मुंबई; प्रमोद चुंचूवार : भाजपला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे नेते प्रमोद महाजन यांची कन्या व विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापल्यानंतर एकेकाळी मुंडे- महाजनांच्या नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील ‘महाजनपर्व’ जवळ जवळ संपण्याच्या मार्गावर आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या एका कन्येचे तिकीट कापून दुसरी कन्या पंकजा यांना देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडे परिवाराचे भाजपात अस्तित्व असले तरी आता प्रमोद महाजनांचे वारस निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत. २०१४ साली जेव्हा देशात मोदी लाट होती, त्या काळात ३३ वर्षीय पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांचा १ लाख ७४ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या मोदी लाटेत महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १.८६ लाखांनी तर नंतर २०१९ च्या निवडणुकीत १.३० लाखांनी पराभव केला.

जनसंपर्क, संघटन संपर्कात कमतरता

महाजन यांच्या वागण्यात अहंकार आणि उद्धटपणा जाणवायचा अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांनीही अनेकदा केली. जनतेला भेटणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे या आघाडीवर महाजन यांची कामगिरी निराशाजनक होती. उत्तर मध्यच्या खासदार असतात तरी कुठे, असा प्रश्न लोक विचारत असत.

भाजप पक्षात संघटनेला अतिशय महत्व दिले जाते. संघटनेसाठी वेळ देणे व संघटनेत काम करणे या आघाडीवरही महाजन यांची कामगिरी पक्षाला निराशाजनक वाटली. संघटनेत त्यांनी काही केलेल्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. महाजन या खासदार असल्या तरी त्यांचे स्वीय सहायकच सारा कारभार हाताळतात व निर्णय घेतात, असा अनुभवही भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांना आला. स्थानिक भाजपच्या तक्रारीची गंभीर दखल घेत भाजप श्रेष्ठींनी अनुकंपा तत्त्वावर किती दिवस महाजनांना संधी द्यायची, असा प्रश्न विचारून त्यांना उमेदवारी नाकारली आहे.

खरे तर दोनदा निवडणूक जिंकलेल्या अनेक खासदारांना भाजपने देशात उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी वाटत असल्याने भाजप नेतृत्वाने फार पूर्वीच महाजन यांचे तिकीट कापले जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते.

हेही वाचा : 

Back to top button