विश्लेषण : हवा आहे, लाट नाही! | पुढारी

विश्लेषण : हवा आहे, लाट नाही!

प्रसन्न जोशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाहीर केल्यानुसार, एकट्या भाजपसमोरचं टार्गेट 370 जागांचं आहे आणि ‘एनडीए’साठी 400 पारचं लक्ष्य आहे. अर्थात, विजय हा विजय असतो; मग तो 272 जागांच्या साध्या बहुमताचा असो की 300, 350, 400 जागांचा. सलग तिसर्‍या पर्वातही मोदी-भाजपनं 300 च्या आसपास जागा मिळवणंही कौतुकास्पदच असणार आहे. भाजप आणि ‘इंडिया’ अशा दोन्ही बाजूंकडून हवा म्हणा किंवा लाट म्हणा ती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा, दुसर्‍या टप्प्याचं मतदान झालेलं असेल. मात्र, नुसतं महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर वगैरे जागांवरून महायुती-आघाडीत रस्सीखेच सुरूच आहे. पहिल्या फेरीतल्या मतदानात 2019 च्या तुलनेत 5 ते 6 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. या दोन्ही घडामोडींचा परस्परसंबंध आहे. ‘अब की बार 400 पार’चा नारा देत भाजप या निवडणुकीत उतरली खरी; मात्र त्यासाठी लागणारा माहोल देशात नाहीये. त्यातही महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीकडून तगडी फाईट असल्याचं उघड दिसतंय. ‘पुढारी न्यूज’ आणि ‘सीएसडीएस-लोकनीती’च्या मतदानपूर्व अंदाजात लोकांची उदासीनता स्पष्ट दिसली. अन्य एका वृत्तवाहिनीनं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा दिल्या. या अंदाजावरूनच हे बदलतं वारं लक्षात यावं. म्हणूनच, वर म्हटल्याप्रमाणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही भाजपशी जागांवर घासाघीस करत आहेत. मात्र, तरीही एक मुद्दा राहतोच की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे मजबूत प्रतिमेचे नेते, पायाभूत सुविधांचा विकास, आंतरराष्ट्रीय पातळीला भारताची वाढलेली पत, विकास दरातील वाढ, पक्ष आणि संघाचं विशाल आणि शिस्तबद्ध काडर असतानाही आजच्या घडीला देशात मोदींची लाट किंवा हवा का जाणवत नसावी?

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला ‘400 पार’ बहुमत मिळालं. चिकित्सकपणे पाहायचं तर त्यामागे काँग्रेस तर सोडाच, खुद्द इंदिरा गांधींचंही मुख्य योगदान नव्हतं. हा अपवादात्मक विजय मिळाला तो त्यांच्या हत्येतून निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे; अन्यथा 80 च्या दशकापासूनच काँग्रेसच्या निवडणुकीय यशाची उतरती भाजणी सुरू झाली होती. म्हणजेच, विजय जरी काँग्रेसचा होत असला, तरी त्यांच्या जागा घटत होत्या. विरोधी पक्ष व खासकरून भाजपच्या जागा वाढत होत्या. म्हणजेच, ज्या ‘ओरिजिनल’ 400 पारचं कौतुक काँग्रेससह अगदी भाजपलाही आहे, ते यश त्या अर्थानं यश नव्हतंच. एकदा हे लक्षात घेतलं, तर उलटपक्षी 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या 300 पार जागांचं यश अधिक ठळक आहे. राफेल खरेदीच्या कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केल्यानंतर, कधी नव्हे ते भाजपला काँग्रेसच्या प्रचाराच्या पीचवर येऊन खेळावं लागलं आणि ‘मैं भी चौकिदार हूँ’चं प्रत्युत्तर द्यावं लागलं. हे काँग्रेसचे, राहुल यांच्या आक्रमकतेचे एका अर्थानं यश होतं. मात्र, तरीही भाजपच्या जागा घटवणं किंवा सत्तेवरून खेचणं राहिलं बाजूला, उलट भाजपनं तेव्हा 300 पारची अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली.

या पार्श्वभूमीवर आज देशात काय दिसतंय? देशात दिल्ली ते महाराष्ट्र आणि दक्षिणेतही तपास यंत्रणांच्या कारवायांचा वाढलेला धडाका निवडणुकीपूर्वीच का? असा सवाल विरोधी पक्ष आणि जनतेतही आहे. या कारवाया फक्त भाजपेतर पक्षांतील नेत्यांबाबतच का? आणि असे नेते भाजपमध्ये किंवा सोबत आल्यास त्यांना दिलासा कसा? मणिपूरमधील तणाव, महिला कुस्तीपटूंबाबत झालेलं वर्तन, इलेक्टोरल बाँड अशा तात्कालिक मुद्द्यांप्रमाणेच बेरोजगारी आणि शेतकर्‍यांवरचं अस्मानी-सुलतानी अरिष्ट अशा दीर्घकालीन मुद्द्यांचा प्रभाव या निवडणुकीवर आहे. मुख्य म्हणजे, 2014 आणि 2019 मध्ये भाजपनं ज्या यशस्वी पद्धतीनं अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या स्तरावर देशाची निवडणूक नेत, मोदी विरुद्ध राहुल असा सामना घडवून आणला, तशी स्थिती सध्या नाही. उलट, 2004 ते 2014 च्या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी-‘यूपीए’लाही जमला नसेल असा ब्रँड-नाममुद्रा ‘इंडिया’ आघाडीचा तयार झालाय. परस्परांचे अगदी शत्रू म्हणावेत असे काँग्रेस, आप, सप, तृणमूल हेही एकत्र आल्यानं ‘इंडिया’ आघाडीची देशात चर्चा आहे. ‘यूपीए’ची प्रमुख कर्तीधर्ती काँग्रेस होती; मात्र ‘इंडिया’ आघाडी हे खरंच सामूहिक नेतृत्व आहे, असं म्हटलं जातंय. अर्थात, तृणमूलनं पश्चिम बंगालात काँग्रेसला महत्त्व न देणे, पंजाबात ‘आप’नं आपला वरचष्मा ठेवणं, महाराष्ट्रात एका फुटलेल्या पक्षानं म्हणजे शिवसेना-‘उबाठा’नं काँग्रेसला लोकसभेच्या जागांसाठी कोंडीत पकडणं, या घटनांमुळे ‘इंडिया’ची परिस्थिती भाजपच्या सध्या सुरू असलेल्या जाहिरातीप्रमाणे एका उपवर मुलीसाठी अनेक वर तयार अशी होऊ नये म्हणजे झालं.

मुख्य मुद्दा आहे की, मोदी व पर्यायानं भाजप ‘400 पार’ जाणार की नाही. ‘पुढारी न्यूज’ला काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे तत्कालीन खासदार कुमार केतकर म्हणाले होते की, 300 च्या खाली एकही जागा आल्यास तो मोदींचा पराभव असेल. यातील भाजप 300 जागा पुन्हा मिळवेल, ही केतकरांनीच दिलेली प्रशस्ती महाराष्ट्रातील अनेक भाजप समर्थकांना गुदगुल्या करील अशीच असली, तरी त्यातील ‘नॅरेटिव्ह’चा मुद्दा महत्त्वाचा आहे. 400 पार हे एक मोठ्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. ते पूर्ण न होताही भाजपची सत्ता आल्यास ते मोदी-भाजपचं कौतुकच असेल.

मात्र, तो जागांचा फरक किती हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जसं केतकर म्हणतात तशी मोदींची किमान कामगिरी 300 आणि कमाल 400+ मानायची, तर मध्यम कामगिरी 350 जागा मानावी लागेल. गंमत म्हणजे मोदींनी संसदेत स्वत:च जाहीर केल्यानुसार, एकट्या भाजपसमोरचं टार्गेट 370 जागांचं आहे आणि ‘एनडीए’साठी 400 पारचं लक्ष्य आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या जागा जर 300 च्या आसपास आणि त्याही भाजपच्या नव्हे, तर ‘एनडीए’च्या (भाजप 290+, मित्रपक्ष 30) असल्यास, तो मोदींच्या प्रतिमेला धक्का असणार आहे. अर्थात, विजय हा विजय असतो; मग तो 272 जागांच्या साध्या बहुमताचा असो की 300, 350, 400 जागांचा. सलग तिसर्‍या पर्वातही मोदी-भाजपनं 300 च्या आसपास जागा मिळवणंही कौतुकास्पदच असणार आहे.

मात्र, या जागा कुठून येणार हेही महत्त्वाचंय. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि अन्य काही जागा दिल्या तरी भाजपचा आकडा 275 च्या पुढे जाण्यासारखी स्थिती नाही, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, हिमाचल, काश्मीर, बिहार, ईशान्य, महाराष्ट्र, दक्षिण भारत इथल्या तब्बल 100+ जागा भाजपला जातील याचं जमिनीवरचं समीकरण भाजपचे पंडितही सांगू शकतील का, हा प्रश्नच आहे. म्हणूनच भाजप आणि ‘इंडिया’ अशा दोन्ही बाजूंकडून हवा म्हणा किंवा लाट म्हणा ती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतिहास असा आहे की, लाट नेहमी विरोधकांची असते आणि सत्ताधारी दुसर्‍यांदा येतात तेव्हा त्यांची हवा असते.

यात गुणात्मक फरक आहे. लाटेमुळे काही मूलभूत बदल घडतात. मतदारांची मनोभूमिका बदलणं, नव्या रचनेचं स्वागत होणं, जुन्याला नकार मिळणं हे ते बदल होत. मात्र, हवा ही लाटेच्या बळावर आलेली पुढची आवृत्ती असते. त्यात मूलभूत बदल नसतो. एका अर्थानं सागायचं झाल्यास, भाजपनं 2014 साली 270+ जागा मिळवणं हे 2019 मध्ये 300+ जागा मिळवण्यापेक्षा अधिक मूलभूत आणि भक्कम आहे. 2019 नंतर आताही भाजपची ‘हवा’ जाणवते; मात्र ‘लाट’ नाही. म्हणूनच, इतकं ऐतिहासिक श्रीराम मंदिर बनूनही हिंदुत्वाचा जो ज्वर, जे चार्ज्ड वातावरण दिसायला हवं ते अगदी उत्तरेतही नाही.

भाजपचा एक हिंदू व्होटबेस बनला आहे. त्याला पुन्हा पुन्हा उत्तेजित होण्याची गरज नाहीये. नेमक्या याच कारणामुळे नवा हिंदू व्होटबेस बनणं संथावलं आहे. म्हणूनच, हवा आहे ती हीच. तिचं वादळ बनत नाहीये.दुसरीकडे, इंडिया आघाडीचीही तीच स्थिती. देशातील कदाचित शेवटची निवडणूक, संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक, 400 पारमुळे संविधान बदललं जाईल, अशी हवा तयार करण्यात विरोधकांना नक्कीच यश आलंय.

अगदी मोदींनाही, खुद्द आंबेडकर आले तरी घटना बदलू शकणार नाहीत, असं विधान कराव लागणं, हे याचंच द्योतक. मात्र, आणीबाणीनंतर जशी इंदिराविरोधाची ‘लाट’ आली, तशी लाट तयार करणं विरोधकांना जमलेलं नाही. त्यातच, काँग्रेसच्या सॅम पित्रोदांसारख्या विचारवंतांनी वारसा संपत्तीवर कर लावण्यासारखी विधानं करून भाजपला प्रतिक्रिया द्यायला आयतं कोलितच दिलं. ज्यामुळे देशातला नवमध्यमवर्ग बिथरण्याचीच शक्यता अधिक. लाट किंवा हवा जशी व्यक्ती, पक्षाची येऊ शकते, तशी एखाद्या मुद्द्याचीही असू शकते. ‘गरिबी हटाव’, श्रीराम मंदिर, भ्रष्टाचार, महागाई, मोफत वीज, कांदा, जनलोकपाल हे असेच काही मुद्दे. यातून सत्तांतरं झालेलीही आपण पाहिली. मात्र, विरोधी पक्षांना अशा एक किंवा जास्त मुद्द्यांची हवा/लाट करण्यात तितकंसं यश आलेलं नाही; पण लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बेरोजगारी आणि ग्रामीण भारताचे मुद्दे सुप्त लाटेच्या स्वरूपात असू शकतात. अर्थात, ‘मोदी की गांधी’ऐवजी मोदी विरुद्ध इंडिया आघाडी असा ‘हवापालट’ही लोकशाहीसाठी बराच म्हणायचा!
(लेखक‘पुढारी न्यूज’ चे नॅशनल न्यूज एडिटर आहेत.)

Back to top button