Psychotherapy : मानसोपचारासाठी ‘टेलिमानस’ आधार! दीड वर्षात कोल्हापुरातून सर्वाधिक कॉल | पुढारी

Psychotherapy : मानसोपचारासाठी 'टेलिमानस' आधार! दीड वर्षात कोल्हापुरातून सर्वाधिक कॉल

मुंबई; आदिती कदम : हॅलो, मला निराश वाटतंय, काही कळेनासे झालेय, मला भीती वाटतेय, मला झोप लागत नाही, मला नोकरीमुळे डिप्रेशन आलंय, मनात आत्महत्येचा विचार येत आहे, अशा असंख्य समस्यांचे फोन राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ हेल्पलाईनवर खणखणत आहेत. राज्यातील विविध शहरांतून दररोज सुमारे १०० फोन या हेल्पलाईनवर येत असून आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय मागत आहेत. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, काम किंवा परीक्षेत येणारे अपयश, घरातील कुरबुरी यांसारख्या विविध बाबींमुळे नागरिकांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. परंतु मानसिक आरोग्य बिघडलेल्या अनेकांना डॉक्टरांकडे जाण्यास कमीपणा वाटतो म्हणून प्रत्येकाने मनमोकळेपणाने संवाद साधावा आणि सल्लामसलत करून योग्य निदान व उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून ‘टेलिमानस’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. टेलिमनसच्या १४४१६ या हेल्पलाईनवर दीड वर्षात तब्बल ६७ हजार ९८२ नागरिकांनी संपर्क साधून उपचार घेतले आहेत.

या हेल्पलाइनवर मनाची उदासीनता, निराशासाठी सर्वाधिक फोन आले आहेत. ताण तणाव, झोप न लागणे, भविष्याचे काय होणार, लग्नातील अडथळे, त्यामुळे येणारे नैराश्य, नातेसंबंध, तणाव, भीती, अती राग, नोकरी न मिळाल्याने आलेले नैराश्य या समस्यांशी संबंधित कॉल जास्त आहेत.

सर्व कॉलना समुपदेशक उत्तरे देतात व नागरिकांच्या मानसिक समस्या सोडवल्या जातात. गरज भासल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक केंद्रात पाठवले जाते. झोपेचा त्रास, निरुत्साह, तणाव, अस्वस्थतेच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्याशिवाय इतरांना मारणे, राग येणे इत्यादी तक्रारीही समोर आल्या आहेत.

कोल्हापुरातून ४ हजार ७७८ कॉल्स आले आहेत. सांगलीतून ३६८८, पुण्यातून ३६६३, मुंबईतून २५६४, औरंगाबादमधून २०५८, बीड १७२८, नाशिकमधून १३९०, उस्मानाबादमधून १४३० हून अधिक कॉल्स आले आहेत, तर रायगडमधून २८० कॉल्स ही सर्वात कमी संख्या आहे.

पुरुषांचे प्रमाण अधिक

  • टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील सर्वाधिक व्यक्तींचा समावेश आहे. त्यानंतर ४६ ते ६४ या वयोगटातील व्यक्ती आहेत. यामध्ये ७० टक्के कॉल पुरुषांकडून तर ३० टक्के कॉल महिलांचे आहेत.
  • टेलिमानस हेल्पलाइनवर दिल्ली, झारखंड, बेळगाव, हैद्राबाद, अहमदाबाद, गोवा, अंदमान बंगलोरसह अन्य शहरातूनही कॉल आले आहेत.

‘कोणत्याही भाषेतील व्यक्ती या हेल्पलाईन नंबरवर कोणत्याही समस्येसाठी मोफत सल्ला घेऊ शकतात. या हेल्पलाइनवर मानसोपचारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. तसेच समस्येचे निराकरण झाल्यानंतर फीडबॅक घेतला जातो.’

– डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक, मानसिक आरोग्य विभाग

Back to top button