राज्य बँक घोटाळा : अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट | पुढारी

राज्य बँक घोटाळा : अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्य बँकेच्या कथित घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) क्लीन चिट दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही. बँकेने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असा निष्कर्ष काढत ‘ईओडब्ल्यू’ने या दोघांसह आ. रोहित पवार यांना दिलासा दिला आहे.

राज्य बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असून, आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये दाखल केलेला तपासबंद अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयाने रद्द करावा, अशी विनंती करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील आणि माणिकराव जाधव यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत.

मात्र, अधिक तपासात काहीच हाती लागले नाही, असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात 35 पानी अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या रिपोर्टबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. अखेर लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अहवालातील निष्कर्ष बाहेर आले आहेत.

‘ईओडब्ल्यू’चा निष्कर्ष

साखर कारखान्यांना कर्ज देण्यासंबंधी व्यवहारांमध्ये कुठलीही अनियमितता वा गैरकृत्य नाही. तसेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना गुरू कमोडिटीकडून भाडेतत्त्वावर घेण्यामध्येही बेकायदेशीर आढळलेले नाही.

तपास यंत्रणेने 2020 मध्ये पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, नंतर राज्य सरकारने त्यावेळी महाविकास आघाडीसोबत असलेले अजित पवार, रोहित पवार यांची चौकशी करण्यासाठी प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली होती. आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिदे यांच्यासोबत महायुतीची कास धरल्यानंतर ‘ईओडब्ल्यू’ने अधिक तपासात काही गैरकृत्य आढळले नसल्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

Back to top button