Hurun Global Rich List 2024 | मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी, बीजिंगला मागे टाकले, जगात तिसऱ्या स्थानी | पुढारी

Hurun Global Rich List 2024 | मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी, बीजिंगला मागे टाकले, जगात तिसऱ्या स्थानी

पुढारी ऑनलाईन : मुंबईने प्रथमच आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून बीजिंगला मागे टाकले आहे. हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालानुसार, मुंबई बीजिंगला मागे टाकत आशियातील अब्जाधीशांची नवीन राजधानी म्हणून उदयास आली आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता ९२ अब्जाधीश आहेत. संपत्ती निर्मितीसाठीचे एक भरभराटीचे केंद्र म्हणून मुंबईने आपला दर्जा आणखी मजबूत केला आहे. (Hurun Global Rich List 2024)

मुंबई ९२ अब्जाधीशांसह न्यूयॉर्क (११९) आणि लंडन (९७) नंतर जगात तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या २७१ अब्जाधीशांच्या यादीत नवीन ९४ लोकांचा समावेश झाला आहे. २०१३ पासून हे प्रमाण सर्वाधिक आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

“हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२४” असे शीर्षक असलेल्या अहवालात मुंबईच्या वेगवान वृद्धीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. “मुंबई ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अब्जाधीश राजधानी आहे. मुंबईत वर्षात २६ अब्जाधीशांची भर पडली असून ती जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ती आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. नवी दिल्ली प्रथमच टॉप १० मध्ये आली आहे.” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अब्जाधीशांच्या संख्येतील उल्लेखनीय वाढीमुळे भारताचे आर्थिक विलक्षण कौशल्य आणखी अधोरेखित झाले आहे. देशात आश्चर्यकारकपणे ९४ नवीन अब्जाधीश झाले आहेत. हे प्रमाण अमेरिका वगळता इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशात एकूण २७१ व्यक्ती अब्जाधीश आहेत. ही वाढ, २०१३ नंतरची सर्वाधिक आहे. हा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढत्या आत्मविश्वासाचा पुरावा आहे, असे संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य संशोधक रूपर्ट हूगेवेर्फ यांनी नमूद केले आहे.

फार्मास्युटिकल क्षेत्र ३९ अब्जाधीशांसह आघाडीवर

या अहवालात भारताच्या अब्जाधीशांच्या भरभराटीत योगदान देणाऱ्या विशिष्ट उद्योगांचे वर्चस्व अधोरेखित केले आहे. ज्यात फार्मास्युटिकल क्षेत्र ३९ अब्जाधीशांसह आघाडीवर आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल आणि ऑटो घटक उद्योग (२७) आणि केमिकल सेक्टर (२४) चा समावेश आहे. भारतीय अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती तब्बल १ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. जी जागतिक अब्जाधीश संपत्तीच्या ७ टक्के एवढी आहे. ही आकडेवारीने देशाच्या महत्त्वपूर्ण आर्थिक प्रभावावर जोर दिला आहे. (Hurun Global Rich List 2024)

मुकेश अंबानी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यमुकेश अंबानीक्ष मुकेश अंबानी हे भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५ अब्ज डॉलर एवढी आहे. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे ८६ अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समधील वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत ३३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

चीनमध्ये मंदी

भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढत असताना चीनमध्ये त्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे अहवालात नमूद करत म्हटले आहे की, “चीनमधील एक वर्ष खराब होते. हाँगकाँगचा शेअर बाजार २० टक्क्यांनी खाली आला. शेनझेन १९ टक्के आणि शांघाय ७ टक्क्यांनी घसरला.” रिअल इस्टेट आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील संघर्ष तसेच चिनी शेअर बाजारातील कमकुवत कामगिरीमुळे चीनमध्ये मंदीचे वातावरण राहिले.

हे ही वाचा : 

Back to top button