एक टक्का दोषी आढळलो तरी कायमचा राजकीय संन्यास घेईन; जरांगेप्रकरणी सर्व आरोप राजेश टोपे यांनी फेटाळले | पुढारी

एक टक्का दोषी आढळलो तरी कायमचा राजकीय संन्यास घेईन; जरांगेप्रकरणी सर्व आरोप राजेश टोपे यांनी फेटाळले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांचे आंदोलन हिंसक होण्यात राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर हे सगळे आरोप माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत. मराठा समाजासाठी माणुसकी म्हणून मी काही मदत केली. प्रक्षोभक असे काहीही केलेले नाही. या प्रकरणी एक टक्का दोषी आढळलो तर मी राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले.

सरकारने सर्व गोष्टींची चौकशी करावी. माझी हरकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण एकजूट आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्ही यात प्रक्षोभक असे काहीही केलेले नाही. कारण आमचा डीएनए सर्वधर्मसमभावाचा आहे.
समाजबांधव अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांसाठी स्टॉल लावणे, न्याहरीसाठी मदत करणे आदी कामे मी केली. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने काम करणारे आहोत, असे त्यांनी सांगितले.

ना माझा हात, ना पवारांची स्क्रिप्ट

या प्रकरणात ना शरद पवारांची स्क्रिप्ट आहे, ना माझा संबंध. समाजाला मदत करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. त्यावरून चौकशी झाली तरी मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईन, असेही ते म्हणाले.

Back to top button