ASER report : विद्यार्थ्यांना अक्षरे कळेनात आणि अंक उमजेनात! वाचा ‘असर’चा अहवाल | पुढारी

ASER report : विद्यार्थ्यांना अक्षरे कळेनात आणि अंक उमजेनात! वाचा 'असर'चा अहवाल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : यावर्षीच्या जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या आकलनाची विदारक अवस्था समोर आली आहे. १४ ते १८ या वयोगटातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील इयत्ता दुसरीच्या दर्जाचे पुस्तकही योग्यरीत्या वाचता येत नसल्याचे चित्र समोर आले आहे. (ASER report)

२८ जिल्ह्यातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३४ हजार ७४५ तरुणांशी संवाद

७७.३ टक्के युवकच दुसरीच्या पुस्तकातील मजकूर वाचू शकतात, तर ३४.४ टक्के किमान भागाकाराचे गणित सोडवू शकतात तर यामधील ५४.३ टक्के युवकांनी किमान इंग्रजी वाक्ये वाचली असल्याचे दिसून आले, तर इयत्ता पहिलीच्या स्तरावर असलेल्या मजकुरापैकी ५५.३ टक्के युवकांनी पॅकेटवरील लेखी सूचना वाचू शकले तर यावर आधारित ४ पैकी किमान ३ प्रश्नांची उत्तरे देऊ शकले, ही परिस्थिती आहे. ही स्थिती राज्यातील नांदेड जिल्ह्यातील १७ ते १८ वर्षांच्या युवक युवतींची वाचन कौशल्याची. देशभरात सर्वेक्षण केल्यानंतर न्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. असरने यावर्षी देशभरातील ग्रामीण
भागामधील १४ ते १८ वर्ष युवकांवर लक्ष केंद्रित करत देशभरातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३४ हजार ७४५ तरुणांशी संवाद साधून हा अहवला तयार करण्यात आला. त्यात प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण केले गेले. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांची निवड सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती. राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांचे अंकगणित आणि इंग्रजी भाषा वाचन कौशल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

वय वर्ष १४ ते १८ वयोगटातील सुमारे पंचवीस टक्के युवकांना आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नसल्याचे समोर आले. अध्यपिक्षा जास्त युवक तीन ते एक अंकापर्यंतच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ ४३ टक्के युवकांनी बरोबर उत्तरे दिली. इयत्ता तिसरी ते चौथी च्या वर्गातील प्रश्नांवर या युवकांशी संवाद साधण्यात आला. अध्यपिक्षा अधिक युवकांनी (५७.३) इंग्रजी भाषेतील वाक्य वाचली. परंतु, त्यातील तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत असल्याचे दिसून आले. मात्र, गणित आणि इंग्रजी मध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असल्याचे दिसून आले.

ASER report : नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षण

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने केलेल्या या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्यात १४-१८ वयोगटातील ९४ टक्के युवांची औपचारिक शैक्षणिक संस्थेत नोंदणी झाली आहे. शासकीय संस्थांमध्ये नोंदणी असण्याचे प्रमाण १२.६ टक्के आहे. सर्वेक्षण केलेल्या युवांपैकी केवळ ७.४ टक्के युवा सध्या व्यावसायिक प्रशिक्षण किंवा इतर संबंधित अभ्यासक्रम घेत आहेत आणि मागील महिन्यात १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक घरकामाव्यतिरिक्त इतर कामे करत असलेल्या युवांचे प्रमाण ४८.८ टक्के इतके आहे, तर ८९.४ टक्के युवांकडे घरात स्मार्टफोन आहे आणि ९२.३ टक्के युवांना स्मार्टफोन वापरता येतो, युवकांमध्ये हे प्रमाण ९४.० टक्के आणि युवतींमध्ये हे प्रमाण ९१.० टक्के आहे. जे स्मार्टफोन वापरू शकतात त्यांच्यापैकी त्यांच्याकडे स्वतःचा स्मार्टफोन असण्याचे ४०.८ टक्के युवकांचे प्रमाण युवतींपेक्षा १३.२ टक्के जास्त असल्याचे नांदेड जिल्ह्यात दिसून आले.

Back to top button