मुंबईत वर्षभरात 1 लाख 27 हजार घरांची विक्री | पुढारी

मुंबईत वर्षभरात 1 लाख 27 हजार घरांची विक्री

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुबंईसाठी 2023 चे वर्ष रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मागील 11 वर्षांतील घरांच्या विक्रीचा विक्रम गाठणारे ठरले. वर्षभरात एक लाख 27 हजार 139 सदनिकांची विक्री झाली आहे. या विक्रीतून शासनाला 10 हजार 889 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यातही ऑगस्ट महिन्यापासून घरांच्या विक्रीत वाढ होत गेली आहे.

नाईट फ्रँक या संस्थेने घरांच्या विक्रीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे. त्यातही डिसेंबर महिन्यास सर्वाधिक 12 हजारचा टप्पा पार केला आहे. 2013 ते 2023 वर्षातील डिसेंबरमधील घरविक्रीचा विचार करता दहा वर्षांतील डिसेंबरमधील ही दुसरी सर्वाधिक विक्री आहे. 2020 मध्ये डिसेंबरमध्ये 19 हजार 581 अशी विक्रमी घरविक्री झाली होती. त्यानंतर आता डिसेंबर 2023 मध्ये 12 हजार 255 घरांची विक्री झाली आहे. 2020 आणि 2023 वगळता मागील दहा वर्षात डिसेंबरमध्ये पाच हजार ते नऊ हजार दरम्यान घरविक्री राहिली आहे. घरविक्रीत मोठी वाढ ही बाब बांधकाम व्यवसायाला चालना देणारी ठरणार असल्याचे मत नाईट फ्रँकचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केले.

घरांच्या किमती 6 ते 10 टक्क्यांनी वाढल्या

कोरोना आणि नंतरच्या काळात घरांच्या विक्री क्षेत्रात मरगळीची स्थिती होती. नंतरच्या काळात गृहनिर्माण उद्योगाला मिळालेल्या सवलतींमुळे तेजीची परिस्थिती आली. मुंबईतील घरांच्या किमती या काळात 6 ते 10 टक्के वाढल्या. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वसई-विरार, पालघर या भागात बांधकामांना वेग येत आहे.

उलाढाल वाढली

गेल्या दीड-दोन वर्षांत व्याजदरात जवळपास अडीच टक्के वाढ झाली. मात्र त्याचा परिणाम मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर झाला नाही, हेच या उलाढालीवरून दिसून येते.

Back to top button