मुंबई : पवईच्या सायकल ट्रॅकला हायकोर्टाचा ब्रेक कायम | पुढारी

मुंबई : पवईच्या सायकल ट्रॅकला हायकोर्टाचा ब्रेक कायम

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेचा पूर्व उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवई सायकल ट्रॅक बांधकामाला दिलेलेली स्थगिती उच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2022 पर्यत वाढवली आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेने पवई तलाव परिसराचे जतन आणि सौंदर्यीकरण करताना येथे सुमारे 10 कि.मी. चा सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला. कामही सुरू केले. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक आणि पर्यावरण प्रेमी ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी संशोधन करणार्‍या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. राजमणी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

नैसर्गिक हानी करून या ठिकाणी कोणतेही बांधकाम केले जाणार नाही अशी हमी महापालिकेने दिली असून या परीसरात खार फुटी नसल्याचा दावाही न्यायालयात केला. मात्र त्याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. मागच्या सुनावणीत सायकल ट्रॅकच्या बांधकामाला स्थगिती दिली होती ती न्यायालयाने 31 जानेवारी2022 पर्यंत कायम ठेवत राज्य सरकार आणि महापालीकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. आणि सुनावणी 13 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

हा सायकल ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. काही झाडेही तोडली जाणार आहेत.

आधीच धोक्यात असलेल्या अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना या ट्रॅकमुळे गंभीर धोका आहे. तलावात मगर, कासव व विविध जलचरांचे अस्तित्व आहे.

सायकल ट्रॅकसाठी त्याठिकाणी भराव टाकल्यास ही जैवविविधतेता नष्ट होण्याची भिती आहे. म्हणून पवई तलाव परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी केली.

Back to top button