Yuva Sangharsha Yatra : “एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न…” शरद पवार यांनी सांगितली जुनी आठवण | पुढारी

Yuva Sangharsha Yatra : "एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न..." शरद पवार यांनी सांगितली जुनी आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेला आज (दि.२४) पुण्यातून प्रारंभ झाला. या यात्रेला युवकांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवरुन पोस्ट करत म्हटलं आहे की, “ही यात्रा काढणाऱ्या तरुणांवर त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. जर दुर्लक्ष करण्याची भूमिका कोणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल आणि म्हणून ही दिंडी ही यात्रा अत्यंत महत्त्‍वाची आहे.”(Yuva Sangharsha Yatra)

Yuva Sangharsha Yatra

Yuva Sangharsha Yatra : जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल

शरद पवार यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवरुन केलेल्‍या पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “आमदार रोहित पवार यांनी सुरुवात केलेल्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना विश्वास आणि बळ देणाऱ्या ‘युवा संघर्ष यात्रा’ याला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्व तरुण युवकांना मार्गदर्शन केले. सन्माननीय व्यासपीठ लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व उपस्थित मान्यवर श्रीनिवास पाटील, ज्यांनी हा सगळा अतिशय धाडसी आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य तरुणांच्या मनातील जो विचार आहे तो मांडून समाजामध्ये एक प्रकारची जागृती करण्याचा एक अतिशय मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या आशा आकांक्षा प्रफुल्लित करण्यासाठी पुढाकार घेतला ते रोहित पवार त्यांचे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..!

एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची मांडणी आम्ही विधिमंडळात केली फारसे यश आले नाही मग ठरवले नागपूरच्या अधिवेशनात शेतकरी दिंडी घेऊन जायची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला उन्हातान्हाचा विचार न करता आमचा वारकरी येतो, पांडुरंगाचे दर्शन घेतो आणि समाधानाने परत जातो. लोकशाहीची पंढरी ही विधिमंडळात असते आणि या पंढरीचे दर्शन घ्यावे आणि शेतकऱ्यांची मांडणी तेथे करावी हे आम्ही ठरवले आणि जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली. मला आठवते की, सामंजस्याने हजारोंच्या संख्येने या काळ्या आईची सेवा करणाऱ्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. जेवणाची व्यवस्था कुठे नसायची पण कधी कमतरता पडली नाही. एखाद्या गावात पोहोचलो की, तेथील भगिनी दिंडी येणार म्हणून ट्रॅक्टरची ट्रॉली भरून भाकऱ्या तयार करायच्या, वांग्याचे भरीत करायच्या आणि खाऊ घालायच्या. एवढा मोठा प्रवास, परंतु कुठेही अन्नधान्याची व्यवस्था करावी लागली नाही.

त्याहीपेक्षा मोठी दिंडी ही तुमची आहे ५०० कि.मी. ही काही लहान सहान दिंडी नाही आणि एकंदरीत ४५ दिवस ही दिंडी चालेल, ही दिंडी नव्या पिढीची आहे, ही दिंडी नव्या पिढीला आत्मविश्वास देणारी आहे आणि ही दिंडी आजूबाजूच्या गावातल्या बंधू-भगिनींना आणि तरुणांना एक प्रकारची प्रोत्साहन देणारी आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की, जे परिवर्तन करायचे जे निर्णय घेतले पाहिजे जो तुमचा आग्रह आहे त्याची प्रक्रिया या संघर्ष युवा मोर्चा मधून होईल. तुम्ही सुरुवात केली आणि लगेचच सरकारने कंत्राटी कामगारांचा निर्णय मागे घेतला अजून तर सुरुवात व्हायची आहे पण, तेवढ्यात हा निकाल झाला आणि तुम्ही ज्या वेळेस सुरुवात कराल, नागपूरला पोहोचाल तेव्हा माझी खात्री आहे की, सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने ही यात्रा काढणाऱ्या तरुणांवर त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर दुर्लक्ष करण्याची भूमिका कोणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल आणि म्हणून ही दिंडी ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे.

तुम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतलाय, ज्याचा उल्लेख रोहितने व आधीच्या लोकांनी केला. सरकारच्या धोरणामध्ये काही गोष्टी समजू शकत नाही त्यांनी असे निर्णय का घेतले ? आता साधी गोष्ट आहे, शाळा चालू आहेत पण, शिक्षक नाहीत. शिक्षकांच्या २ लाख ५० हजार जागा रिक्त आहेत. यापेक्षा कितीतरी अधिक बेरोजगारांची संख्या आहे. म्हणून हा मुद्दा तुम्ही हातात घेतला, ही भरती झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था चालतात चालवतात पण, काही लोक भरमसाठ फी घेतात. ही पद्धत योग्य नाही त्याचे शुल्क परत करण्याची भूमिका घेतली पाहिजे हा ही मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहात. शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पद आहेत ती भरली पाहिजेत. भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून करणे असे निकाल तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी आणखी एक गोष्ट मांडली आणि माझ्या मते ती अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर व अमरावती अशी जी टू टायर शहरे आहेत त्या ठिकाणी आयटी क्षेत्राचा उल्लेख केला की, त्यांचा विकास केला पाहिजे.”

Yuva Sangharsha Yatra : ‘या’ आहेत प्रमुख मागण्या?

  • कंत्राटी नोकरभरती रद्द करा.
  • 2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करा.
  • अवाजवी परीक्षा शुल्क रद्द करा.
  • जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
  • सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी करावी
  • क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावे
  • होतकरू खेळाडूंना संधी मिळावी
  • पेपरफुटी विरोधात कायदा
  • शाळा दत्तक योजना रद्द करा.
  • बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी
  • नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी
  • समुह शाळा योजना रद्द करावी.
  • रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात.
  • महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा.
  • सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI संस्थाचे सक्षमीकरण होण्यासाठी.
  • नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यात यावा
  • TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळालीच पाहिजे.
  • सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी
  • प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी
  • शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत
  • असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up Skilling देण्यात यावे
  • युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह मिळालेच पाहिजे.
  • महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी.
  • तालुका स्तरावर MIDC ची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC च्या सक्षमीकरणासाठी.
  • अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणण्यात यावे
  • ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाई. या प्रमुख मागण्यासाठी रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा निघाली आहे.

पुणे ते नागपूर असा असेल युवा संघर्ष यात्रेचा प्रवास?

पुणे ते नागपूर असा हा आठशे किलोमीटरचा युवा संघर्ष यात्रेचा प्रवास असणार आहे. तब्बल ४५ दिवसांचा हा प्रवास असणार आहे. पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून, पुढे काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव मार्गे नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button