Mumbai News : शाळेच्या दाखल्यावर फी न भरल्याचा शेरा; विक्रोळीतील इंग्रजी शाळेचा प्रताप | पुढारी

Mumbai News : शाळेच्या दाखल्यावर फी न भरल्याचा शेरा; विक्रोळीतील इंग्रजी शाळेचा प्रताप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : (Mumbai News) विक्रोळीतील एका शाळेने विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरच चक्क फी भरली नसल्याचा शेरा मारला आहे. या गंभीर प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला असून शिक्षण विभागाकडे या शाळेची तक्रार करण्यात आली आहे. विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मिडियम विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी शाळा सोडण्याचा दाखला देत असताना शाळेने शाळा सोडल्याचा दाखल्यावर शाळेची फी थकित असल्याचा शेरा मारुन विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण केले आहे. त्या विद्यार्थ्याची ६१ हजार ६४० फी देणे बाकी असल्याचेही शेरा मध्ये नमूद केले आहे. (Mumbai News)

या विद्यार्थ्याच्या पालकांनी या संदर्भातील लिखीत तक्रार धीरज कांबळे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्याशी संपर्क साधला. पालक महासंघाच्या वतीने दळवी यांनी या सर्व प्रकाराची तक्रार महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि शिक्षण विभागाकडे केली आहे. (Mumbai News)

याबाबत शाळेकडून स्पष्टीकरण देताना मुख्याध्यापिका सुजाता घोडके यांनी म्हटले आहे की, इंग्रजी माध्यमाच्या या विनाअनुदानित माध्यमिक शाळेत २००५ ते २०२२ या काळात २ हजार ४२५ पालकांनी १ कोटी ५७ लाख इतके शिक्षण शुल्क न भरता आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. वारंवार विनंती करुनही शाळेला ही रक्कम मिळालेली नाही. (Mumbai News)

हेही वाचा : 

Back to top button