विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे कायम! विरोधकांचा आक्षेप फेटाळला | पुढारी

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे कायम! विरोधकांचा आक्षेप फेटाळला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले असल्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर राहण्याबाबत विरोधकांनी घेतलेला आक्षेप तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी फेटाळला आहे. डॉ. गोऱ्हे यांच्याविरोधात अपात्रतेची नोटीस दाखल झाली असली तरी विद्यमान नियमान आणि संविधानातील तरतुदीनुसार डॉ. गोऱ्हे यांना बहाल केलेले उपसभापतीपदाचे अधिकार अबाधित राहतील. कोणत्याही नियमानुसार त्यावर आक्षेप घेता येणार नाही, असा निर्णय तालिका सभापती डावखरे यांनी दिला.

उपसभापती पदावरून दूर करणे आणि अपात्रतेची नोटीस या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. अपात्रतेच्या नोटिसीचा कोणताही परिणाम त्यांच्या उपसभापती पदी असण्यावर होऊ शकत नाही. डॉ. गोऱ्हे या १४ मे २०२० पासून सभागृहाच्या सदस्य आहेत. त्या निवडून आल्या त्यावेळी विधिमंडळात नोंदणी असलेल्या ज्या शिवसेना पक्षाने त्यांना पाठिंबा दिला तो पक्ष त्यांनी बदललेला नाही. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह कायम आहे.

संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सभापती किंवा उपसभापतींच्या पक्षांतरासंदर्भात सूट देण्यात आली आहे, याकडे तालिका सभापतींनी सभागृहाचे लक्ष वेधले. सभापती किंवा उपसभापतींच्या अपात्रतेच्या नोटीसी संदर्भात सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. मात्र, अपवादात्मक स्थितीत ही चर्चा झाली. या चर्चेचा संदर्भ भविष्यात कोणीही घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश डावखरे यांनी दिले.

Back to top button