आर्यन खान आजची रात्र सुद्धा ऑर्थर रोड जेलमध्येच जाणार | पुढारी

आर्यन खान आजची रात्र सुद्धा ऑर्थर रोड जेलमध्येच जाणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात २५ दिवसांनी जामीन मिळालेल्या आर्यन खानची आजची रात्र सुद्धा जेलमध्येच जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाची प्रत मिळाल्यानंतर ती आज (ता. २९) सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाकडे पोहोचणे आवश्यक होते, पण मात्र ती वेळेत न पोहोचल्याने जेल प्रशासनाने आर्यन खानची सुटका करण्यास नकार दिला.

ऑर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जेलमधून बाहेर येण्यासाठी रिलीज ऑर्डर बेल बॉक्समध्ये ठेवावी लागते, जेल प्रशासनाकडून त्यासाठी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटापर्यंत वाट पाहण्यात आली. त्यामुळे आर्यन खान याची आज सुटका होणार नाही. उद्या (ता.२९) सकाळी आर्यनची सुटका होणार असल्याचे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्व प्रक्रिया पार पडली आहे : जुही चावला

दरम्यान, आर्यन खानसाठी जुही चावला जामीनदार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी ती दुपारीच सत्र न्यायालयात दाखल झाली होती. न्यायाधीशांची सही झाली असून सर्व प्रक्रिया पार पडल्याचे ती म्हणाली. आर्यन खान लवकरच घरी परतणार असल्याने आनंद झाल्याचे ती म्हणाली. हा सर्वांसाठी मोठा दिलासा असल्याचेही तिने न्यायालयीन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.

2 तारखेला धनत्रयोदशीने दीपोत्सवाला सुरुवात होत असून, याच दिवशी शाहरुखचा म्हणजेच आर्यनच्या अब्बाचा वाढदिवसदेखील आहे. त्यापूर्वीच आर्यन आपल्या घरी ‘मन्‍नत’वर पोहोचलेला असेल.

१३ अटींवर आर्यनची घरवापसी होणार

  • दरम्यान, आर्यनला जामीन मिळाला असला, तरी त्याला १३ अटींचे पालन करावे लागेल.
  • एक लाखाच्या जात मुचलक्यासह त्याची सुटका होईल. मात्र आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.
  • सोडायचा असल्यास न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागेल.
  • चौकशी अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही. प्रवास करताना त्याला माहिती द्यावी लागेल.
  • कोणत्याही प्रकारच्या गैर कृत्यात सहभागी होता येणार नाही.
  • सहआरोपींशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करता येणार नाही.
  • विशेष न्यायालयात सुनावणी सुरु असताना सुनावणीवर परिणाम होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही.
  • साक्षी पुराव्यांविरोधात छेडछाड करण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
  • विशेष न्यायालयाकडे पासपोर्ट जमा करावा
  • या प्रकरणाशी निगडीत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांना देऊ नये.
  • प्रत्येक शुक्रवारी ११ ते २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागेल.
  • न्यायालयातील सर्व सुनावणींना हजर राहावे लागेल.
  • एनसीबीकडून जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलावणे येईल त्यावेळी चौकशीला हजर राहणे
  • सुनावणीसाठी वेळेचा अपव्यय करू नये

हे ही वाचलं का?

Back to top button