चर्चा समीर वानखेडेंची पण या मराठी सेलिब्रेटींची आडनाव माहीत आहेत का ? | पुढारी

चर्चा समीर वानखेडेंची पण या मराठी सेलिब्रेटींची आडनाव माहीत आहेत का ?

पुढारी ऑनलाईन डेस्क

शाहरूखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून राज्याच्या राजकारणात आणि बॉलिवूड जगतात रामायण सुरुच आहे. या प्रकरणात दररोज नवीन एक खुलासा होत आहे. त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय अशी विचारायची वेळ सामान्यांवर आली आहे. महागाईचा आगडोंब सुरुच असतानाच हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का ? अशीही विचारणा होऊ लागली आहे.

दरम्यान बॉलिवूडमधील गांजापूर गँगमधील अनेकांना कर्दनकाळ ठरलेल्या समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आता आरोप होऊ लागल्याने आता हे प्रकरण वेगळ्याच मार्गावर पोहोचले आहे. समीर वानखेडे यांना तुमची जात आणि धर्म कोणता अशी जाहीर विचारणाच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक दररोज वेगवेगळा खुलासा करत आहेत आणि त्यावर वानखेडे कुटुंबाकडून खुलासा असा प्रकार झाला आहे.

समीर वानखेडे यांच्या जात धर्मावरून चर्चा सुरु असतानाच मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक चेहरे आहेत ज्यांची नावे प्रत्येकाच्या तोंडी आहेत, पण त्यांचे आडनाव काय? हे अजूनही कोणाच्या माहितीमध्ये नाही. मग त्यामध्ये सायली संजीव, अमृता सुभाष, ललित प्रभाकर, रसिका सुनील, संगीत अजय अतुल भाग्यश्री अशी अनेक नावे आहेत, पण त्यांचे आडनाव विचारल्यास अजून कोणालाच खास माहिती नाही.

सायली संजीव

सायली संजीवने अनेक मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. सध्या ती ऋतुराज गायकवाडमुळेही चर्चेत आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.

अमृता सुभाष

अमृता सुभाषने चित्रपट, मालिका आणि नाटकामध्ये काम केलं आहेच, पण तिनं लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून ख्याती मिळवली आहे. तिची प्रसाद ओक सोबतची अवघाचि संसार ही झी मराठी वाहिनीवरील मालिका विशेष गाजली. तिने संदेश कुलकर्णी यांच्याशी विवाह केला असला, तरी आपलं अमृता सुभाष हे नाव कायम ठेवलं आहे.

रसिका सुनील

‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील शनया ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली रसिका सुनील सुद्धा टोपण नावाने परिचित आहे. रसिका सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती सातत्याने शेअर करत असते. तिनं आपल्या नावासोबत वडिलांच नाव कायम ठेवलं आहे, पण तिच आडनाव धबडगावकर आहे हे कोणालाच माहीत नसावे.

संगीतकार अजय अतुल

संगीतकार अजय अतुल यांची जोडी मराठीसह बॉलिवूडमध्येही दबदबा राखून आहे. त्यांच्या संगीताचे चाहते राज्यातच नव्हे, देशातही आहेत. त्यांनी आपले आडनाव गोगावले न लावता आपल्या नावानेच सगळीकडे परिचित आहेत.

ललित प्रभाकर

ललित प्रभाकर हा एक मराठी चित्रपट, टीव्ही आणि नाटकांमध्ये नाव कमावलेला अभिनेता आहे. ललितने नाटकांमधून बरीच छाप सोडली. ललितने आपल्या पहिल्या कार्यक्रमात झी मराठीवर कुंकूमध्ये मोहितची भूमिका देखील बजावली होती. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत देखील त्याने भूमिका भूषविली होती. त्याचे नाव जुळून येती रेशीमगाठीच्या आदित्य देसाई यानंतर प्रसिद्ध झाले. मात्र त्यांच्या चाहत्यांना आडनाव अजूनही माहीत नसेल. तो ललित प्रभाकर नावाने वावरत असला, तरी त्याचे आडनाव प्रभाकर नसून भदाणे आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button