समीर वानखेडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार | पुढारी

समीर वानखेडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना तीन दिवसांची नोटीस दिल्याशिवाय अटक करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. नवाब मलिक यांच्या आरोपांच्या मार्‍यात अडकेलल्या वानखेडे यांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले.

वकील अतुल नंदा यांच्यामार्फत या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंतीही वानखेडे यांनी न्या. नितीन जामदार आणि न्या. एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाला केली.

आर्यन खानच्या अटकेनंतर वानखेडे यांचे जाहीर चारित्र्यहनन केले जात आहे. खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांमार्फत चौकशी करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत या चौकशीला वानखेडे यांनी आव्हान दिले आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचाही उल्लेख याचिकेत आहे.

एका मंत्र्यासह महाराष्ट्र सरकारमधील सदस्यांनी वानखेडे यांच्यावर आरोपांचा भडीमार चालवला असून, ते भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत दोषी असल्याचा जणू निर्णयच टेलिव्हिजन मुलाखती, ट्विटर आणि समाजमाध्यमांवरून जाहीर केला आहे, असेही वानखेडे यांची याचिका म्हणते.

आपल्यावरील आरोपांबाबत मुंबई पोलिसांच्या चौकशीत पक्षपात आणि अन्याय होण्याची शक्यता वानखेडे यांनी व्यक्त करत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अथवा राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अशा स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण देण्याच्या मागणीस विरोध दर्शवला.

चौकशी आताच सुरू झाली असून, अद्याप एपआयआरही दाखल झालेला नाही. त्यामुळे ही याचिका अकाली आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर, वानखेडे यांना अटक करणार नसल्याची हमी देण्यास मुंबई पोलीस तयार आहेत का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.

कोणत्याही केंद्रीय अधिकार्‍याची चौकशी सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून परवानगी घेण्याची तरतूद भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात आहे याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. त्यावर अरुणा पै यांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि वानखेडे यांना अटक करावयाची असल्यास तीन कार्यालयीन दिवसांची नोटीस दिली जाईल, अशी हमी त्यांनी दिली. ती मान्य करून न्यायालयाने याचिका निकाली काढली.

आर्यन शाहरुख खानला कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप होत आहेत. त्यातच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्याने अटक होण्याची भीती आहे, असे सांगत वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकेपासून संरक्षण मागितले.

Back to top button