शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला! : नाना पटोले | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला! : नाना पटोले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशार्‍यावर महाराष्ट्राला 10 वर्षे अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरले आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हे सरकार लवकरात लवकर जावे हीच जनतेची इच्छा आहे, असेही पटोले म्हणाले.

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना होऊन शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. शिंदे सरकारच्या या वर्षपूर्तीवर नाना पटोले यांनी टीका करताना सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. हे सरकार स्थापन करताना घेतले गेलेले सर्व निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे ठरवले आहेत.

राजभवनचा गैरवापर करुन, आमदारांना ईडी, सीबीआयची भिती घालून ‘खोके’ देऊन सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकारच असंवैधानिक आहे. पण न्यायालयाच्या निर्णयानंतरही ईडी सरकार खुर्चीला चिकटून बसले आहे, अशी टीका पटोले यांनी केली. वर्षभरात या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही. शिंदे सरकारच्या जुलै 2022 ते जानेवारी 2023 या सात महिन्यांच्या काळातच राज्यात 1 हजार 23 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, तर दर 10 तासाला एक आत्महत्या होत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

Back to top button