मुंबई : विक्रोळीच्या शुश्रुषा हॉस्पिटलचा पुन्हा चित्रीकरणासाठी वापर | पुढारी

मुंबई : विक्रोळीच्या शुश्रुषा हॉस्पिटलचा पुन्हा चित्रीकरणासाठी वापर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी व सभासदांनी आवाज उठवल्यानंतर विक्रोळीच्या शुश्रूषा हॉस्पिटलचा चित्रीकरणासाठी वापर करणे हॉस्पिटल प्रशासनाने बंद केले होते.मात्र आता पुन्हा एकदा या हॉस्पिटलमध्ये चित्रीकरण सुरू झाले आहे.

विक्रोळीत मुंबई महापालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून नुतनीकरणाच्या नावाखाली ते बंद आहे. या हॉस्पिटलमुळे विक्रोळीसह भांडुप आणि कांजूरमार्ग मधील रहिवाशांना आरोग्य सेवा उपलब्ध होत होती.बंद असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सध्या फक्त बाह्यरुग्ण विभागच सुरू आहे.या हॉस्पिटल नंतर शुश्रूषा हॉस्पिटलचीही उभारणी झाली.सहकारी तत्त्वावरील या हॉस्पिटलमुळे ज्यांना पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जायचे नाही,आणि ज्यांना याच भागातील नामांकित परंतु खाजगी हॉस्पिटल परवडत नव्हते त्यांना शुश्रूषाचा पर्याय मिळाला होता.मात्र य हॉस्पिटलमध्ये नामांकित आणि तज्ञ डॉक्टरांची वानवा असल्याने तसेच उपचाराचा खर्चही काहीसा चढा असल्याने या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूपच कमी होते.शिवाय हॉस्पिटल चालवण्यासाठी निधीचीही कमतरता होती.परिणामी अखेर हे हॉस्पिटल बंद पडले. हॉस्पिटल सुरू करण्याऐवजी ते चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जाऊ लागले. याप्रकाराबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती.आंदोलनेही झाली होती.त्यामुळे काही काळ चित्रीकरण बंद झाले होते.आता पुन्हा ते सुरू झाले आहे.

काँग्रेसचे राहुल वागधरे यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले. प्रशासनाच्या व्यापारी वृत्तीने उचल खाल्ली आणि परत एकदा आरोग्य सेवेसाठी बांधलेल्या या इमारतीचा वापर शूटिंग साठी सुरू झाला आहे. सभासदांना आरोग्य सुविधा आणि सवलती देणे तर दूरच; पण त्यांना विचारात न घेता हॉस्पिटल प्रशासन खुशाल चित्रीकरणासाठी जागा देत आहेत. हॉस्पिटल समोरील रस्त्यावर शूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅन उभ्या रहात आहेत,असे त्यांनी सांगितले. हा प्रकार न थांबल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button