मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी | पुढारी

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक तसेच पाच वर्षे मुंबई विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून काम पाहिलेल्या डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केलेल्या या नियुक्तीची घोषणा मंगळवारी सायंकाळी राजभवनमधून करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपल्याने विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

नवे कुलगुरू नेमण्यासाठी राज्यपालांनी नेमलेल्या शोध समितीने 19 मे रोजी पात्र ठरलेल्या पाच जणांची नावे राज्यपालांकडे सादर केली होती. राज्यपालांनी 26 मे रोजी अंतिम पाच जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर कुलगुरू कोण होणार या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 10 दिवसांनी राज्यपालांनी मुंबई विद्यापीठ कामकाजाचा अनुभव असलेले आणि प्र-कुलगुरू म्हणून या अगोदरच काम केलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा केल्याने तब्बल आठ महिने प्रतीक्षेत असलेले कुलगुरूपद अखेर विद्यापीठाला मिळाले आहे.

डॉ. कुलकर्णी यांनी नागपूर विद्यापीठातून 2005 साली पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांच्याकडे 29 वर्षांचा अनुभव आहे. उच्च शिक्षणातील विविध समितीत वेगवेगळ्या स्तरावर प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी, तर कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय भावे श्रसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची, तर कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. संजय भावे यांची नियुक्तीही राज्यपाल यांनी मंगळवारी केली. डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे अ‍ॅग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे प्रमुख आहेत.

Back to top button