मुंबईसह १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा | पुढारी

मुंबईसह १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईसह ठाण्यात येत्या २४ तासांत ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघरमध्येही रिमझिम पाऊस होऊ शकतो. धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

  • पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे, तर दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावरही चक्राकार वारे वाहात आहेत.
  •  या प्रणालीपासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Back to top button