सेक्स वर्क हा गुन्हा नाही; पण सार्वजनिक ठिकाणी 'ते' करणे गुन्हा ठरू शकते : मुंबई न्‍यायालय | पुढारी

सेक्स वर्क हा गुन्हा नाही; पण सार्वजनिक ठिकाणी 'ते' करणे गुन्हा ठरू शकते : मुंबई न्‍यायालय

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सेक्स वर्क हा गुन्हा नाही; पण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कामात गुंतणे इतरांसाठी ते त्रासदायक ठरल्यास त्याला गुन्हा म्हणता येईल, असे निरीक्षण मुंबईतील सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. सेक्स वर्क हा गुन्हा नसल्याचे सांगत न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये मुलूंड येथील वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर ताब्यात घेतलेल्या ३४ वर्षीय महिलेची निवारा गृहातून मुक्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी सेक्स वर्क करत असेल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर त्याला गुन्हा म्हणता येईल, असेही न्यायालयाने स्‍पष्‍ट केले.

वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्‍यात आले हाेते. यावेळी न्यायदंडाधिकार्‍यांनी तिला एका वर्षासाठी निवारागृहात ठेवण्याचे निर्देश दिले हाेते. या निर्णयाविराेधात संबंधित  महिलेने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.  सत्र न्यायालयाने म्हटले की, “पीडित ही एक सज्ञान आहे. तिला विनाकारण ताब्यात घेतले असेल तर म्हणता येईल की तिच्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये कुठेही असे दिसून आले नाही की, पीडिता सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कामात गुंतली होती. पीडितेला कुठेही राहण्याचे आणि मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे.” दरम्यान, तिच्या याचिकेला विरोध करत ती पुन्हा वेश्या व्यवसायात गुंतण्याची शक्यता असल्याचे न्‍यायालयाने नमूद केले.

फेब्रुवारीमध्ये मुलूंड येथे छापेमारीनंतर ताब्यात घेतलेल्या ३४ वर्षीय महिला सेक्स वर्करला निवारागृहातून मुक्त करण्याचे निर्देश देताना सत्र न्यायालयाने म्हटले आहे की, पीडित महिला ही एक सज्ञान आहे. देशातील नागरिक म्हणून तिला मुक्तपणे फिरण्याचा, देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा मूलभूत अधिकार आहे. केवळ तिच्या व्यवसायाची पार्श्वभूमी पाहून पीडितेला ताब्यात घेणे योग्य नाही. तिला दोन मुलं आहेत. त्यांना त्यांच्या आईची गरज आहे. पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेतलं असेल तर त्यामुळे तिच्या अधिकारांवर गदा येते,” असे स्‍पष्‍ट करत न्यायाधीशांनी यावेळी सेक्स वर्कर्सच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा हवाला दिला.

महिलेने न्यायालयात सांगितले की, एफआयआर दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी आणि तिच्यासह तिघी पीडितांना माझगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पीडितांना वय पडताळणीसाठी पाठवण्यात आले. त्यांची मध्यंतरी कोठडी वाढवण्यात आली. दरम्यान, न्यायदंडाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला. ज्यात पीडित सज्ञान असल्याचे निष्पन्न झाले. महिलेने सांगितले की, तिघींपैकी दोन पीडितांना आधीच सोडण्यात आले होते; पण तिची देवनार येथील निवारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली होती.

पीडितेने आपला कोणत्याही अनैतिक कामात सहभाग नसल्याचे सांगितले. तिला मुले असून त्यांना तिची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. एका हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक महिलांना वेश्याव्यवसायासाठी ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बोगस ग्राहकांच्या मदतीने छापा टाकण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

 हे ही वाचा :

Back to top button