पुढारी ऑनलाईन : दोघे दीर्घकाळ विभक्त राहत आहेत. अशा परिस्थितीत सहवास नसताना लग्नाच्या नावाखाली नात्याच्या बंधनात राहण्यास सांगणे ही एक प्रकारची क्रूरता आहे. अशा प्रकारचे नाते संपुष्टात आणणे चांगले आहे. या टिप्पणीसह सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) २५ वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीला लग्नाच्या बंधनातून मुक्त केले. अशा जोडप्याला वैवाहिक नात्यात राहण्यास सांगणे म्हणजे क्रूरतेला पाठिंबा दिल्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने केलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पत्नीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे ही क्रूरता नाही, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने दिल्लीतील एका दाम्पत्याचे लग्नाचे नाते संपुष्टात आणताना सांगितले की, आमच्या समोर असे एक विवाहित जोडपे आहे जे केवळ चार वर्षे एक दाम्पत्य म्हणून एकत्र राहिले आणि ते गेल्या २५ वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांना अपत्य नाही. त्यांचे वैवाहिक नाते पूर्णपणे तुटलेले आहे आणि ते सुधारण्यापलीकडे गेले आहे. हे नाते संपुष्टात आलेच पाहिजे यात आम्हाला शंका नाही. कारण त्यांना नात्यात राहण्यास सांगणे 'क्रूरतेला' मान्यता देण्यासारखे आहे.
न्यायालयाने पुढे नमूद केले की मध्यस्थाद्वारे दोघांच्यात समझोता अथवा तडजोड करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला आहे. २५ वर्षांत पक्षकारांमधील अनेक प्रकरणे लक्षात घेता, न्यायालयाने टिप्पणी केली की दोघांच्या नात्यात कटुता आहे. त्यांनी कधीही शांततेत जीवन जगले नाही आणि म्हणूनच दोघांचे केवळ कागदावरच वैवाहिक नाते आहे.
दीर्घकाळापासून वेगळे राहणे आणि दोघांच्यात सहवास नसणे आणि तसेच दोघांमधील नाते तुटणे हे हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (१) (ia) अंतर्गत हे प्रकरण 'क्रूरता' म्हणूनच पाहायला हवे. या जोडप्याला मूलबाळ नाही. यामुळे त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आल्याने केवळ दोघांवरच त्याचा परिणाम होईल याचीही दखल घेतली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच दोघांचे वैवाहिक नाते संपुष्टात आणत न्यायालयाने पतीला त्याच्या विभक्त पत्नीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून ३० लाख देण्याचे निर्देश दिले.
या जोडप्याने एप्रिल १९९४ मध्ये दिल्लीत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. पण लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पतीचा आरोप होता की पत्नीला त्याचे छोटे घर आवडत नाही. तसेच ती अपशब्द वापरते. १९९४ मध्ये पत्नीने त्याला कल्पना न देता गर्भपात केल्याचा आरोपही पतीकडून करण्यात आला होता.
४ वर्षांच्या संसारानंतर पत्नी पतीची घर सोडून गेली. तिने पतीसह त्याच्या भावाविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यावरून पोलिसांनी पती आणि भावाला अटक केली होती. मात्र, नंतर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर पत्नीने सासरच्यांविरोधात आणखी फौजदारी तक्रारी केल्या.
हे ही वाचा :