सागरी महामार्गाला संभाजी महाराजांचे नाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

सागरी महामार्गाला संभाजी महाराजांचे नाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणार्‍या

पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती गेट वे अ‍ॅाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहोचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन भव्य-दिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Back to top button