‘मविआ’तील पक्षांनी एकत्र राहावे : शरद पवार | पुढारी

‘मविआ’तील पक्षांनी एकत्र राहावे : शरद पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी ही एकविचाराने आणि समन्वयाने चालवावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट झाल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. काही मुद्द्यांवर वेगळी मते असली, तरी ‘मविआ’तील पक्षांनी एकत्र राहावे आणि सर्वांनी एकविचाराने काम करावे, अशाप्रकारची चर्चा झाल्याचे स्वतः शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.

विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत अलीकडे विसंवादी सूर उमटत होते. त्यामुळे आघाडीत बिघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पवार आणि ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीवरूनही उलटसुलट कयास लावले जात असताना बुधवारी स्वतः शरद पवार यांनीच बैठकीचा तपशील सांगितला.

काही मुद्द्यांवर वेगळी मते असली, तरी आज महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकविचाराने काम करावे, अशाप्रकारची आमची चर्चा झाली. त्याप्रमाणे काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे धोरण ठरले आहे, असे पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शरद पवारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ आणि महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. अनेक विषय चर्चेमध्ये होते, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वादग्रस्त विषय टाळणार

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सध्या सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सभेत झालेल्या चुका टाळतानाच 16 एप्रिल रोजी नागपूरच्या सभेतून आघाडीची एकसंध भूमिका जनतेपुढे मांडण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आघाडीत मतभिन्नता होणारे वादग्रस्त विषय टाळण्यावरही चर्चा झाली. ‘मविआ’त एकजूट राहावी, घटनेच्या विरोधात असणार्‍या पक्षांचा आघाडी विरोध करेल, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button