कार्यकारी अभियंता गोळीबार; मुख्य शूटर पोलीस कोठडीत | पुढारी

कार्यकारी अभियंता गोळीबार; मुख्य शूटर पोलीस कोठडीत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : बोरिवली परिसरात मिरा-भाईंदर येथील महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबिट यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी अजय चंद्रशेखर सिंग या मुख्य शूटरला शुक्रवारी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी बोरिवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खांबिट यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी अजय सिंग हाच असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

गेल्या महिन्यात 29 सप्टेंबरला बोरिवली येथे दीपक खांबिट यांच्यावर बाईक वरून आलेल्या दोन तरुणांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात खांबिट थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्या कारला दोन गोळ्या लागल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरांतून पाच आरोपींना अटक केली होती. त्यात श्रीकृष्ण सदाशिव मोहिते, यशवंत सदाशिव देशमुख, अमित भास्कर सिन्हा, प्रदीपकुमार शिवचंद्र पाठक आणि राजू गरहू विश्वकर्मा यांचा समावेश होता.

आरोपींपैकी श्रीकृष्ण आणि यशवंत हे दोघेही मिरा-भाईंदरचे कनिष्ठ अभियंते आहेत. त्यांचे खांबिट हे वरिष्ठ अधिकारी आहेत. खांबिट यांच्यामुळेच त्यांचे प्रमोशन होत नव्हते. त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळत नसल्याने या दोघांनीच टोळीच्या मदतीने खांबिट यांच्या हत्येसाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिली.

त्यानंतर अमित सिन्हा आणि अजय सिंग यांच्यावर खांबिट यांच्यावर गोळीबार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी खांबिट यांच्या दैनंदिन कामाची रेकी केली होती. ते कधी कार्यालयात येतात, कार्यालयातून ते घरी कधी जातात, यादरम्यान ते कुठे-कुठे जातात याची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचा पाठलाग केला. गुन्ह्याच्या दिवशी ते दोघेही दीपक यांच्या पाठलाग करत बोरिवलीत आले.

* घटनेवेळी अमित हा बाईक चालवत होता, तर सुनील पाठीमागे बसला होता. बोरिवलीतील नॅशनल पार्कसमोरच सुनीलने दीपक यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारानंतर सुनील उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील गावी पळून गेला. दोन दिवसांपूर्वी त्याला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याच गुन्ह्यात त्याला पुढील चौकशीसाठी शुक्रवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. त्याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Back to top button