भेटी लागे जीवा..! | पुढारी

भेटी लागे जीवा..!

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेेस-राष्ट्रवादीशी पाट लावल्यानंतर महाविकास आघाडी झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आले. हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावल्याने भाजपचा संताप झाला. विशेषतः, देवेंद्र फडणवीस यांचा मोठाच हिरमोड झाला. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांचे युद्ध सुरू झाले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव जाईनासा झाला. एकमेकांवर टीकेचे बाण सोडताना कोणतीही कसर ठेवली जात नव्हती, नाहीही! मधल्या काळात शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यानंतर मात्र या नेत्यांमधील शब्दयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. रोज एकमेकांवर जोरदार टीका केल्याखेरीज या दोन्ही नेत्यांचा दिवस जात नाही. असे हे नेते आज अचानक विधिमंडळाच्या गेटमधून एकत्र आत येताना दिसले आणि माध्यमांची एकच तारांबळ उडाली. सकाळपासून सुरू असलेल्या कामकाजात फारसे काही न मिळाल्याने सुस्तावलेल्या माध्यम प्रतिनिधींना ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र येण्याने चांगलेच खाद्य मिळाले. बरे दोघेही चांगले एकमेकांबरोबर असे हास्यविनोद करीत विधिमंडळाच्या आवारात आले की, जणू काही मधल्या काळात काहीच झाले नव्हते! सोबत आदित्य ठाकरेही होतेच!

झाले! चॅनेल्सवर बातम्या झळकू लागल्या. उद्धव आणि भाजपमध्ये जवळीक वाढली. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता… असे मथळे टी.व्ही. स्क्रीनवर दिसू लागल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली. वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले. राजकीय निरीक्षक आणि पत्रकार आपापल्या चॅनेल्सवर तावातावाने मते मांडू लागले. स्वतः उद्धव ठाकरे यांनाच याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आणखी कोड्यात टाकणारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पूर्वी खुलेपणाने भेटी होत असत. आता बंद दाराआडची चर्चा फलदायी होते, असे म्हणतात. मी आणि फडणवीस एकत्र गेटमधून आलो, तेव्हा एकमेकांशी रामराम, हाय, हॅलो करतो तसेच झाले. आता कुणाला हाय, हॅलो करणेही पाप झाले की काय, असा सवाल उद्धव यांनी केला. मात्र, उद्धव यांचा हा खुलासा पटणारा नव्हता. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात लग्नावरून थट्टा-मस्करी झाली होती आणि आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसत-खेळत गप्पा मारताना दिसले!

उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. या अधिवेशनात ते तिसर्‍यांदा सभागृहात आले. आज सभागृहात वन विभागासंदर्भात चर्चा सुरू होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे हजरजबाबी गृहस्थ आहेत. बोलता बोलता ते मध्येच एखादा शेरा असा मारतात की, सभागृहात हंशा-टाळ्यांचा गजर होतो. गेल्या युती सरकारच्या काळात मुनगंटीवारच वनमंत्री होते, त्यांनी वनीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्यातल्या सर्वच पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते, उद्धव ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. उद्धव यांनीही स्वतः तेव्हा झाड लावले होते, असे वर्णन वनमंत्र्यांनी केले. समोरच्याच बाकावर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी त्या झाडाला फळेच आली नाहीत, असा शेरा मारला.

उद्धव यांच्या या शेर्‍याला प्रत्युत्तर न देतील तर ते मुनगंटीवार कसले? ते म्हणाले, उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की, झाडाला फळे येतील; पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन या झाडाला कोणते खत हवे हे सांगायचो; पण तुम्ही दुसरेच खत दिले. मग, झाडाला फळे कशी येतील? असा मिश्कील सवाल वनमंत्र्यांनी केला. मुनगंटीवारांच्या या टिपणीवर तुम्ही खताऐवजी निरमा पावडर टाकली, असा प्रतिशेरा उद्धव यांनी मारला. सुधीर मुनगंटीवारांनीही मग ठाकरेंना प्रतिटोला हाणला. अहो, ते खतच होते; पण ते निरमाच्या पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही भलताच पदार्थ झाडाला टाकल्याने झाड जळाले. अजूनही फारसे बिघडलेले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा, झाड नक्की वाढेल!
मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही जुगलबंदी निरस वातावरणात गंमत आणणारी असली, तरी आजच्या दिवसातले हे दोन प्रसंग माध्यमांत आणि बाहेरही भलतेच चर्चेत आले, हे खरेच! उद्धव-फडणवीस यांच्यातल्या या भेटीमुळे शिवसेनेच्या अनेक आमदारांचे चेहरे पडलेले होते. टेन्शनमध्ये असलेले हे आमदार याच पडलेल्या चेहर्‍यांनी माध्यमांना चुकवत फिरत होते!

      – उदय तानपाठक

Back to top button