मुंबई : ‘ईडी’विरोधात मुश्रीफ हायकोर्टात; आज तातडीने सुनावणी | पुढारी

मुंबई : ‘ईडी’विरोधात मुश्रीफ हायकोर्टात; आज तातडीने सुनावणी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते व माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे न जाता ‘ईडी’च्या कारवाई व समन्सविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

‘ईडी’ने सुरू केलेली चौकशी आणि बजावलेल्या समन्सला आव्हान देत ही बेकायदेशीर कारवाई तातडीने रोखा, ‘ईडी’ने दाखल केलेला ‘ईसीआयआर’ रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका त्यांनी दाखल केली असून, या याचिकेची मंगळवारी (दि. 14) न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

कागल (जि. कोल्हापूर) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत उच्च न्यायालयाने कारवाईपासून चार दिवसांपूर्वी पोलिसांना रोखले होते. मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणात मुश्रीफ यांच्याविरोधात ‘ईसीआयआर’ दाखल करून चौकशीचा ससेमिरा मागे लावत सोमवारी ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले. मात्र, मुश्रीफ यांनी ‘ईडी’समोर चौकशीला न जाता ‘ईडी’च्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्येष्ठ वकील अ‍ॅड. आबाद पोंडा आणि अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी सोमवारी ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी मुश्रीफ यांच्या वतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी ‘ईडी’च्या कारवाईमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करून याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.

ही विनंती मान्य करत खंडपीठाने याचिकेची सुनावणी मंगळवारी निश्चित केली आहे.

सूडबुद्धीने कारवाईचा दावा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’ने छापे घातले. कोलकाता येथील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये कारखान्यात ट्रान्स्फर झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा पैसा कोठून आला. हा आर्थिक अफरातफरचा पैसा आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच त्यांनीच मुश्रीफ यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आयकर विभाग व ‘ईडी’ सक्रिय झाली आहे. यावर मुश्रीफ यांनी तीव— आक्षेप घेतला आहे. ‘ईडी’मार्फत निव्वळ राजकीय सूडबुद्धीनेच कारवाई सुरू आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेतील ठळक मुद्दे

* हसन मुश्रीफ यांच्या घर आणि परिसरावर ‘ईडी’ने यापूर्वी तीनवेळा छापे टाकले. यामध्ये शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘ईडी’, ‘सीआयएसएफ’च्या अधिकार्‍यांसह पोलिसांनी आठ इनोव्हा कारच्या ताफ्यासह येऊन केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

* ‘ईडी’ने 2013 मधील कंपनी कायद्याच्या कलम 447 (फसवणूक) अंतर्गत खासगी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू ठेवली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने दि. 2 मे 2022 रोजी मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

* मुश्रीफ यांना ‘ईडी’ प्रकरणात नाहक गोवण्याचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते, असा याचिकेत उल्लेख आहे.

* ‘ईडी’ने मागील काही महिन्यांत अनेकदा छापे टाकूनही कुठलीच आक्षेपार्ह गोष्ट त्यांच्या हाती लागलेली नाही.

* ‘ईडी’ किरीट सोमय्या यांच्या राजकीय अजेंड्यानुसार काम करतेय, हेच वास्तव असल्याने न्यायालयाने याचिकेत हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुश्रीफ यांच्या वतीने याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Back to top button