पृथ्वी शॉ वर हल्ला केल्याप्रकरणी सपना गिलला ४ दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

पृथ्वी शॉ वर हल्ला केल्याप्रकरणी सपना गिलला ४ दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला केल्याप्रकरणी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सपना गिलला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपर्यंत तिला पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे. सपना गिलचा साथीदार शोभित ठाकूर आणि इतर आरोपी अजूनही फरार असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

पृथ्वी शॉचा मित्र आशिष यावद यांनी गुरुवारी (दि.१६) दिलेल्या फिर्यादीनंतर सपना गिल आणि अन्य ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी (दि.१७) न्यायदंडाधिकारी न्यायालयात सपना गिलला हजर केले असता तिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सेल्‍फी घेण्‍यास नकार दिल्‍याने आठ जणांच्‍या टोळक्‍याने क्रिकेटपटू  पृथ्वी शॉ याच्‍या कारची तोडफोड केली होती. हा धक्‍कादायक प्रकार बुधवारी (दि.१६) रात्री मुंबईत घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला. तर ओशिवारा पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्री सपना गिललाही अटक केली. पृथ्वी शॉच्या संबंधितांनी या प्रकरणी सांगितले होते की, पृथ्वी शॉ सांताक्रुज येथील एका  हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. सेल्फीसाठी त्‍याने पृथ्वी शॉकडे विचारणा केली.पृथ्वीने त्याला नाराज न करता सेल्फी घेण्‍यास परवानगी दिली. काही वेळाने हा व्यक्ती आपल्या काही मित्रांसमवेत तेथे आला. मित्रांबरोबरही सेल्फी घेण्‍याचा आग्रह करु लागला. याला पृथ्वी शॉने सांगितले की, मी मित्रासोबत जेवण करण्यासाठी आलो आहे. आम्हाला यामध्ये व्यत्यय नको आहे. मात्र चाहते सेल्‍फीसाठी आग्रही राहिले. अखेर पृथ्वीने हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार केली. हॉटेल मॅनेजरने सेल्फीसाठी विचारणा करणाऱ्या लोकांना बाहेर जाण्यास सांगितले.

सपना गिलची पृथ्वी शॉ कडे खंडणीची मागणी

पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र हॉटेलमधून जेवण करुन बाहेर पडत होते. त्यावेळी काहीलोक बेसबॉल स्टिक घेऊन बाहेर उभारले होते. या लोकांनी पृथ्वीच्या कारच्या काचा फोडल्या. यावेळी पृथ्वी शॉही या कारमध्ये होता. तक्रारीत म्‍हटले आहे की, हल्‍ला झाला तेव्‍हा पृथ्वी शॉ कारमध्येच होता. त्याला कोणताही वाद नको होता. त्यामुळे पृथ्वीला दुसऱ्या कारमधून पाठवण्यात आले.  याठिकाणी एक महिला आली. तिने पृथ्वी शॉकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच ५० हजार दिले नाहीत तर खोट आरोप लावण्यात येतील, अशा प्रकारची धमकीही संबंधित महिलेने दिली. यानंतर पृथ्वीच्या मित्राने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button