पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Special Century : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विशेष कामगिरी केली. भारताच्या पहिल्या डावात मैदानात उतरताच त्याने खास शतक झळकावले. वास्तविक, कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक डाव खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने कांगारूंविरुद्ध 100 डावांचा टप्पा पार केला असून त्याच्या आधी केवळ सचिन तेंडुलकरला असे शतक गाठण्यात यश आले आहे.
सचिनने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 आंतरराष्ट्रीय डाव खेळले. या यादीत सचिननंतर कोहली (100 डाव) दुस-या क्रमांकावर आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत संयुक्तपणे तिसर्या स्थानावर आहेत, त्यांनी 96-96 डाव खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरने फटकावल्या आहेत. त्याने 39 सामन्यांत 55.00 च्या सरासरीने 3630 धावा वसूल केल्या आहेत. (Virat Kohli Special Century)
भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 21 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. खेळाच्या अर्ध्यातासानंतर नॅथन लायनने केएल राहुलची विकेट घेवून पहिले यश मिळवले. यानंतर काही अंतरांनी भारतीय फलंदाज मैदानावर हजेरी लाऊन तंबूत परतले. पहिल्या चार विकेट एकट्या लायनने मिळवल्या. दुसरे सत्र संपपर्यंत त्याने एकूण पाच विकेट घेतल्या होत्या. यात कर्णधार रोहित शर्मा (32), चेतेश्वर पुजारा (0), श्रेयस अय्यर (4), केएस भरत (6) यांना माघारी धाडण्यात लायनला यश मिळाले.
विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला पायचीत केले. पंचांनी कोहलीला आऊट दिले, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण तिस-या पंचांनी विराट बाद असल्याचे घोषित केले.