पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या पाठिंब्यानेच : देवेंद्र फडणवीस | पुढारी

पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या पाठिंब्यानेच : देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाला आणि भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन केले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीमागेही पवारांचाच हात असल्याचे खुद्द फडणवीस यांनी सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या गौप्यस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खुद्द शरद पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. तसेच शरद पवार असे काही करतील असे वाटत नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीपूर्वी पडद्यामागे घडलेले राजकारण प्रथमच उघड करताना फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही खुले आव्हान दिले. अजित पवार सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती हे त्यांना सांगावे लागेल. सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्याकडे (राष्ट्रवादीत) काय स्ट्रॅटर्जी बदलल्या हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितले तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असा इशाराही फडणवीस यांनी देऊन ठेवला.

माझ्याशी दोन वेळा विश्वासघात झाला, अशी सुरुवात करून फडणवीस म्हणाले, एकत्र लढूनही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली हा माझ्याशी केलेला मोठा विश्वासघात होता. पण शरद पवार यांनीही शब्द देऊन फिरवला हा दुसरा विश्वासघात होता, असे ते म्हणाले.

माझ्यासोबत एकदा नव्हे, दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढविल्या. आमच्यासोबत निवडूनही आले. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. ते स्वतःही तसेच म्हणत होते. पण आपल्याला मुख्यमंत्री होता येईल, असे संख्याबळ दिसताच त्यांनी काँगेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू केली. त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. एकप्रकारे त्यांनी माझा विश्वासघात केला. दुसरा विश्वासघात आमच्यासोबत शरद पवार यांनी केला. पण त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की, आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला.

राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला जर धोका देते, त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहात बसता येत नाही. त्यामुळे आम्ही ठरविले की, चला. ठीक आहे. आपण सरकार बनवू. त्यावेळी झालेली चर्चा ही शरद पवार यांच्यासोबतच झाली होती. ती काही नुसती चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण पाहिल्याच आहेत, असे फडणवीस म्हणाले. पण, शरद पवार यांच्यापेक्षा पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण तो आपल्याच व्यक्तीने केला होता, अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.

शिंदेंसोबतचे सरकार नैसर्गिक

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे सरकार स्थापन केले याबाबतही फडणवीस यांनी मुलाखतीत खुलासा केला. सरकार आल्यानंतर या दोघांनी आमच्यासोबत जी वागणूक केली, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली. त्यांच्या पक्षात कुरबुरी सुरू झाल्या. त्यांना हे सरकार मान्य नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार चालत नाही. आम्हाला गुदमरतंय, असे त्यांना वाटत होते. त्याची संधी घेत आम्ही त्यांना सोबत घेतले. आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे हे एकदम नैसर्गिक सरकार आहे. कारण सरकारमधील लोकांनी एकमेकांसाठी मते मागितली होती. त्यामुळेच मी ‘बदला’ हा शब्द वापरला होता. तुम्ही मला जे दिले ते व्याजासहित परत केले, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रचार सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण निकालानंतर सेनेचे संख्याबळ वाढले, तेव्हा आपल्याला मुख्यमंत्री होता येईल, असे त्यांना वाटले. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की, ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत निघून गेले. दुसरा विश्वासघात ज्यांनी केला, त्यांना कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत चर्चा करत आहेत हे लक्षात आले आणि राष्ट्रवादीकडून आम्हाला स्थिर सरकार तयार करूया म्हणून ऑफर आली. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे सगळ्यांनी पाहिले आहे.

राष्ट्रवादीचीच ऑफर होती!

ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत, त्यांची चर्चा पुढे गेली आहे हे आमच्या लक्षात आले. पण त्याचवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की, आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आपणच सरकार बनवू. त्यामुळे आम्हीही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी फक्त शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही नुसती चर्चा झाली नव्हती. या चर्चेनंतर अनेक गोष्टी ठरल्या होत्या. पण त्यावेळीही विश्वासघात झाला,असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचे वक्तव्य असत्याच्या आधारावर : शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले आहे. त्यांचे हे वक्तव्य असत्याच्या आधारावर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मला वाटते, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्ये करतील, असे मला कधी वाटले नाही. फडणवीस यांनी कोणत्या अधारावर हे विधान केले ते माहीत नाही.

Back to top button