एलआयसीला नऊ महिन्यांत २२ हजार ९७० कोटींचा नफा | पुढारी

एलआयसीला नऊ महिन्यांत २२ हजार ९७० कोटींचा नफा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत २२,९७० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. एलआयसीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची नुकतीच बैठक झाली. तीत एलआयसीने गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेत झालेल्या नफ्याची माहिती देण्यात आली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एलआयसीने म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीने एकूण ३, ४२, २४४ कोटी रुपयांचा प्रीमियम नोंदवला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.६५ टक्के इतका वाढला आहे. उपलब्ध सॉल्व्हन्सी मार्जिनच्या वाढीशी संबंधित नॉन- इक्वल शेअरधारकांच्या खात्यातून १९,९४१.६० कोटी रुपये हस्तांतरण केल्यामुळे एलआयसीचा चालू कालावधीचा नफा वाढला आहे. १९,९४१.६० कोटी रुपयांच्या रकमेत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ५,६६९.७९ कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय मागील तीन तिमाहींसाठी ५,५८०.७२ कोटी रुपये, ४, १४८.७८ कोटी रुपये आणि ४,५४२.३१ कोटी रुपयांचा समावेश असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. एलआयसीच्या व्यवसायाची गती मजबूत असून त्याचा परिणाम ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नात दिसला. आता एलआयसीचा एकूण बाजारातील हिस्सा ६५.३८ टक्के झाला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ६१.४० टक्के होता.

Back to top button