४०९.२६ कोटींच्या घोटाळ्यात आमदार गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

४०९.२६ कोटींच्या घोटाळ्यात आमदार गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : परभणीतील गंगाखेड विभागाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आणि साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यासह गंगाखेड शुगर अॅन्ड एनर्जी लि. विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ४०९. २६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात गुट्टे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचीही नावे असल्याने येत्या काळात गुट्टे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. च्या संचालकांपैकी एक आहेत. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. ने २००८ ते २०१५ या काळात युको बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून मुदत कर्ज, खेळते भांडवल सुविधा आणि अन्य क्रेडिट सुविधा अशा एकूण ५७७.१६ कोटी रुपयांच्या विविध सुविधा घेतल्या. बँकेच्या आरोपांनुसार, कंपनीने संभाव्य कर्ज निधी वळवला आणि स्टॉक स्टेटमेंटमध्ये निव्वळ चालू मालमत्तेचा अतिरेक करून खेळत्या भांडवलामध्ये जादा ड्रॉइंग पॉवरचा लाभ घेतला आहे. यामुळे कंपनीसाठी रोख टंचाई निर्माण झाली. व्यवसायाचे नुकसान झाले आणि शेवटी बँकांची थकबाकी न भरली गेल्याने कंपनीचे खाते एक नॉन परफॉर्मिंग अॅसेट बनले.

कंपनीने २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत साखरेच्या व्यापारासाठी पुरवठादारांच्या नावे युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून १९७.१७ कोटी रुपयांचे लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) उघडले, असा बँकेचा आरोप आहे. एलसीच्या अंतर्गत माल नाकारण्यात आला आणि १४३.४७ कोटी मूल्याचे खरेदी परतावा नोंदी पुस्ताकात दाखविल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील व्यवहार व्यापारातील साखर खरेदीसाठी सामान्य व्यावसायिक व्यवहारांच्या स्वरूपाचे नव्हते. एलसीचा अयोग्य वापर करून बँकिंग प्रणालीकडून वित्तपुरवठा करण्यासाठी वापरण्यात आले, असे आरोप बँकेने केले आहे. बँकेने कंपनीच्या विरोधात आर्थिक अनियमिततेच्या अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. कंपनी आणि तिचे प्रवर्तक / संचालक यांचा हेतू चुकीचा होता. त्यांनी बँकिंग व्यवस्थेचा गैरफायदा घेतला. बँकांद्वारे प्रदान केलेल्या विविध कर्ज सुविधांचा गैरवापर केला. कंपनीने कथितरित्या बँकांचे व्याज धोक्यात आणले आणि कर्ज मंजूर उद्देशांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरले गेले. कंपनीने निधी वळवण्याबरोबरच सार्वजनिक निधीची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यात करण्यात आला आहे.

सीबीआयने नुकतीच गुट्टे आणि अन्य आरोपींच्या नागपुरातील दोन आणि परभणी येथील तीन ठिकाणी छापेमारी करुन शोध मोहीम राबविली होती. त्यानंतर आता गुट्टे यांच्यासह मुलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर भादंवि आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हेगारी कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्ध कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीने याप्रकरणात २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले आहे.

Back to top button