बोगद्यांमुळे महामार्गांवरील अपघात नियंत्रणात; वेळ, इंधनाची बचत | पुढारी

बोगद्यांमुळे महामार्गांवरील अपघात नियंत्रणात; वेळ, इंधनाची बचत

अलिबाग; जयंत धुळप : गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या कालखंडात महामार्ग बांधणी तंत्रज्ञानात मुळात खूप मोठा बदल झाला असून त्यामध्ये महामार्गावरील बोगदे हे अपघात नियंत्रण, वेळेची बचत, इंधन बचत, जंगल बचाव आदी विविध मुद्द्यांवर प्रभावी आणि यशस्वी ठरले असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात मुंबई ते पुणे दरम्यान द्रुतगती महामार्गावर तयार झाल्यावर त्यावरील बोगद्यांमुळे मुंबई-पुणे हे प्रवासी अंतर पाच ते सहा तासावरून दोन ते अडीच तासावर आले आणि त्यांची यशस्वीता प्रथम लक्षात घेऊन मग पुढे महामार्गांवर बोगद्यांचे नियोजन करण्यास प्रारंभ करण्यात आला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा, खंडाळा दरम्यान अनेक छोटे-मोठे बोगदे लागतात. येत्या काळात लवकरच या मार्गावर डोंगराखालील, तलावाच्या तळाखालून जाणार्‍या बोगद्याची भर पडणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवी खोपोली ते कुसगाव मार्गिकेतील (मिसिंग लेन प्रकल्प) प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या बोगद्याचे, पर्यायाने नवीन मार्गिकेचे कामही वेगाने सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा हा बोगदा आशियातील सर्वांत रुंद बोगदा असणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्यातून वाहनांना प्रवास करता येणार आहे.

राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान करण्यासाठी नवीन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय 1990 मध्ये घेण्यात आला. ब्रिटिशकालीन जुना मुंबई ते पुणे महामार्ग भविष्यात अपुरा पडणार असल्याने नवीन महामार्ग बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हाती घेण्यात आले. महामार्गाचे प्रत्यक्ष काम 1998 मध्ये सुरू झाले. हा 94.5 किमीचा महामार्ग 2002 मध्ये पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर अडीच ते तीन तासांत कापता येऊ लागले. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. मात्र हा राज्यातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा महामार्ग मानला जात असून देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग अशी ही त्याची ओळख आहे. या महामार्गाला 2009 मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दरम्यान अत्याधूनिक तंत्रज्ञानाने खोदण्यात येणार्‍या 3.4 किमी अंतराचा बोगदा मुंबई रत्नागिरी दरम्याने अंतर तब्बल दिड ते दोन तासांनी कमी करणारा ठरणार?आहे. एप्रिल 2023 अखेर हा बोगदा वाहतूकी साठी सुरु होण्याची शक्यता आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे लोकार्पण नुकतेच झाले. 521 कि.मी.च्या या मार्गावर मराठवाड्यातील पहिला आणि या मार्गावरीलही पहिला बोगदा विशेष आकर्षण ठरतो आहे. औरंगाबादजवळ सावंगी येथे साकारलेला बोगदा 260 मीटर लांब, 17.5 मीटर रुंद आणि 47 उंचीचा आहे.

आशियातील सर्वांत रुंद बोगदा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली ते कुसगाव अशी 19.80 किमीची नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्याचवेळी महामार्ग आठपदरी करण्यात येणार आहे. दरम्यान खोपोली ते कुसगाव मार्गिकेमुळे मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर आणखी 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच प्रवासही अधिक सुरक्षित होणार आहे. या मार्गिकेत दोन बोगदे बांधण्यात येत असून त्यातील एक बोगदा चक्क डोंगराखालून, तलावाखालून गेला आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर हा आशियातील सर्वांत रुंद बोगदा असेल.

प्रवासाचा वेळ कमी करण्यात बोगदे जसे यशस्वी ठरतात त्याच बरोबर इंधन बचत करून पर्यावरणात मिसळणार्‍या काबर्र्न मोनॉक्साईड या गॅसचे प्रदूषण कमी करण्यात देखील यशस्वी झाले आहेत. पूर्वीच्या तंत्रानुसार घाट रस्ते तयार करुन मार्ग पुढे नेण्यात येत?असे, यामध्ये झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असे त्याच बरोबर संबंधित डोंगराचा भूगोल बदलल्यामुळे त्याचा स्वाभावीकच पर्यावरणावर विपरित परिणाम होत असे, तो बोगद्यांमुळे थांबत?आहे. सर्वसाधारणपणे बोगदे हे दुपदरी असल्याने समोरुन वाहन येण्याचा प्रश्न नसतो त्यामुळे एकमार्गी वाहतूकीमुळे वाहतूक कोंडी न होता सलग आणि विनाअपघात वाहतूक सुरू राहते.
-डॉ. प्रल्हाद एन.पाडळीकर, स्थापत्य तज्ज्ञ तथा महामार्ग अभ्यासक.

Back to top button