हैदराबाद साडेतीन तासांत; मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे | पुढारी

हैदराबाद साडेतीन तासांत; मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : प्रस्तावित मुंबई हैद्राबाद अतिजलद रेल्वे महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून धावणार असून या प्रकल्पाच्या मार्गावरील ग्रामस्थांसमोर सोमवारी सादरीकरण करण्यात आले.

प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे 1200 हेक्टर जमीन लागणार ठाण्यातील म्हातार्डी, बेटावडे, आगासन टारफे-पाचनाड, उसळघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली या गावांचा समावेश असल्यामुळे या रेल्वेच्या मार्गावरील ग्रामस्थांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी सोमवारी खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक एस.के. पाटील, एजिस इंडिया प्रा. लिमिटेडचे प्रकल्प संचालक सत्यव्रत पांडे, शाम चौगुले उपस्थित होते. प्रकल्पाच्या सल्लागार डॉ. अपर्णा कांबळे व प्राजक्ता कुलकर्णी यांनी सामाजिक व पर्यावरणीय सर्वेक्षण व अभ्यासासंबंधी सादरीकरण केले. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने का प्रकल्प उभारला जात आहे. या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे पर्यावरण, वाहतुकीवरील परिणाम, बाधित कुटुंबांची संख्या आणि संबंधित गावावर होणारे परिणाम आदींचा अभ्यास सध्या करण्यात येत असून सर्वेक्षण करण्याचे कामही सुरू असून लागणार्‍या जमिनीचे ड्रोनद्वारेही सर्वेक्षण सुरू आहे.

  • 649.76 किमीचा हा मार्ग संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर असेल.
  • 14 तास प्रवास करून सध्या हैदराबाद गाठावे लागते. हाच प्रवास तीन तासांवर येणार.
  • दहा डब्यांच्या हायस्पीड रेल्वेत एकावेळी 750 प्रवासी बसू शकतील.
  • महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून ही गाडी धावणार असून त्यात ठाणे जिल्ह्यातील एकूण 9 किमीचा समावेश आहे.
  • ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, जहीराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांवर ही गाडी थांबेल
  • 350 ताशी वेगाने धावणारी ही रेल्वे 649.76 किमीचे अंतर साडेतीन तासांत पार करणार आहे.

Back to top button