मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचा जागर | पुढारी

मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचा जागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे ४ ते ६ जानेवारीदरम्यान मुंबईतील वरळी येथील क्रीडा संकुलात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
लुप्त होत चाललेली वाद्य, खाद्य आणि वस्त्र संस्कृतीचे सादरीकरण तसेच साहित्य, कला व संगीत या सर्व सांस्कृतिक रंगांचा परामर्श घेणे हासुद्धा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. या निमित्ताने भव्य ग्रंथ प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. सातासमुद्रापार विश्व मराठी मराठी भाषा जतन करणारे परदेशातील मान्यवर आपले अनुभव यावेळी सांगणार आहेत. लंडन, अमेरिका, दुबई, नायजेरिया इत्यादी देशातील सुमारे ५०८ मान्यवरांनी नोंदणी केली आहे.

संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे. ४ जानेवारी रोजी लेझीम पथक, ढोल ताशा पथक व मर्दानी खेळ यांच्या साथीने संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर निमंत्रितांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. नचिकेत देसाई, केतकी भावे, माधुरी करमरकर, मंगेश बोरगावकर व श्रीरंग भावे हे कलाकार काही अजरामर | मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग | कलेचे हा वंदना गुप्ते, निना कुलकर्णी, शिवाजी साटम अशोक पत्की अशा सिने नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे.

लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल, आज आणि उद्या हा परिसंवाद होईल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या परिसंवादाच्या अध्यक्ष असतील, तर श्रेया बुगडे संचालन करणार आहेत. या संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे. यात लेखिका पटकथाकार मनीषा कोरडे भाषा तज्ज्ञ अमृता जोशी, झी स्टुडिओच्या वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीन गोकर्ण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत यांचा सहभाग आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री संविधान गुरु करणार आहेत. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडीलकर, उत्तरा केळकर यांच्यासह उर्मिला धनगर, वैशाली माडे आदी कलावंत गीते सादर करतील. उद्योजकांशीही या संमेलनात चर्चा होणार आहे. यामध्ये गिरीश चितळे हे चितळे डेअरीचे, तर हावरे बिल्डरच्या उद्योजिका उज्ज्वला हावरे यांच्यासह भारताबाहेरील मराठी उद्योजकही सहभागी होतील. याशिवाय ऐश्वर्या नारकर, आनंद इंगळे, गिरिजा ओक, अनिरुद्ध जोशी, चित्रकार सुहास बहुलकर, अभिनेते संजय मोने, नेमबाज अंजली भागवत, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि संस्कृती बालगुडे यांनाही निमंत्रण देण्यात आली आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले

केवळ मुंबई-पुणे केंद्रित संमेलन

एकाच वेळेस लागोपाठ मराठीचे एक सरकारी विश्व संमेलन आणि दुसरे जागतिक मराठी परिषदेचे ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन एक मुंबईत व एक पुण्यात असे होत आहे ही मराठी विश्वासाठी आनंदाची बाब आहे. मात्र दोन्हीकडे उपक्रम, सहभाग हा मुंबई-पुणे केंद्रीच तेवढा असणे व उर्वरित महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्यात नसणे ही खेदाची बाब आहे. त्यातल्या त्यात जागतिक मराठी परिषदेचे शोध विश्व सरकारी संमेलनापेक्षा अधिक प्रातिनिधिक आहे. विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्र असा उर्वरित महाराष्ट्र मात्र दोन्हीकडे प्रतिबिंबित होतच नाही, विदर्भासह या भागातदेखील विविध क्षेत्रांत प्रतिभा आहे याचीही प्रातिनिधिक तरी नोंद त्यात असावी अशी अपेक्षा गैर ठरू नये. मराठी माणसाच्या कार्य कर्तृत्वाचे दर्शन घडवण्याऐवजी वैश्विक नावावर काहीतरी केल्यासारखे सरकारी संमेलन होते आहे. सरकारी संमेलन घेणाऱ्यांनी आम्हाला पत्र पाठवली, कोणत्या स्वरूपात आमंत्रित आहोत, कशात, काय सहभाग हवा आहे, याचे कोणतेच उल्लेख पत्रात नाहीत. प्रवास, निवास व्यवस्थेचे काय त्याचा उल्लेख नाही, त्याचा खुलासा झाल्यास ठरवता येईल असेही कळवले.
– श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख संयोजक, मराठीच्या व्यापक हितासाठी

Back to top button