मुंबई : माजी नगरसेविका सुरेखा पाटील अखेर शिक्षिका पदावरून निलंबित | पुढारी

मुंबई : माजी नगरसेविका सुरेखा पाटील अखेर शिक्षिका पदावरून निलंबित

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  प्रभाग क्रमांक २७ च्या भाजपाच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी सुरेखा पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो मोर्फ करून फेसबुकवर अपलोड करून विडंबन केले होते. सामाजिक कार्यकर्ते रूपेश धनावडे यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार शिक्षण उपसंचालक यांनी कायदेशीर बाबी तपासून सुरेखा पाटील यांना सहाय्यक शिक्षक पदावरून निलंबित करण्याचे आदेश दिले.

नगरसेविका सुरेखा पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी २०२० भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मॉर्फ करून फेसबुकवर अपलोड केला होता. विडंबन केल्याप्रकरणी त्यांना शिक्षाही झाली होती. शासकीय अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षिका असल्यामुळे तत्काळ निलंबन होणे अपेक्षित होते; परंतु शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले, असे तक्रारदार रूपेश धनावडे यांनी सांगितले. याविषयी लोकाआयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर लोकायुक्त यांच्यामार्फत ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी शिक्षण उपसंचालक यांना कायदेशीर बाबी तपासून योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

यानंतर योग्य चौकशी करून शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत सुरेखा मनोज पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित शाळेला देण्यात आले. तसेच अनुदत्त विद्यालयाचे प्राचार्य यांनी २३ डिसेंबर रोजी निलंबन केल्याचे लेखी पत्र प्रसिध्द शिक्षण विभाग आणि तक्रारदार धनावडे यांना दिले. शाळेकडून कारवाई पूर्ण करत प्रभाग क्रमांक २७ च्या भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा मनोजकुमार पाटील यांचे सहाय्यक शिक्षिका पदावरून निलंबन करण्यात आले.

Back to top button