Hapus mango : यंदा हापूसचा हंगाम केवळ ५० दिवसांचा | पुढारी

Hapus mango : यंदा हापूसचा हंगाम केवळ ५० दिवसांचा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील : आंबा म्हणजे फळांचा राजा. हिवाळा सुरू झाला की खवय्यांना हापूस आंब्याचे ( Hapus mango ) वेध लागतात. यावर्षी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे यंदा ५० दिवसांचा म्हणजे जेमतेम दिड ते दोन महिने हंगाम मिळेल अशी बिकट स्थिती आहे. कोकण हापूसची मुंबईवारी २५ एप्रिपर्यंत लांबणार आहे. वातावरणातील सततच्या बदलाने आणि अवकाळी पावसामुळे नोव्हेंबरमध्ये हापूसच्या बागानी वांज मोहोर (कणी ) धरली नाही. यंदा १५ ते २० फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल अशी स्थिती होती. हापूस मोहोराला चांगली सुरूवात झाली होती. मात्र अवकाळी पावसाचा तडका बसल्याने शेकडो हापूसच्या बागातील मोहोर नोव्हेंबरमध्ये गळून पडले.

 Hapus mango : पहिला फटका सुमारे २५ ते ३० कोटी रूपयांचा बसण्याची शक्यता

वातावरण आणि अवकाळी पावसामुळे झाडांनी वांज मोहोर (कणी) धरली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून सुरु होणारा हापूसचा हंगाम आणखी दोन महिने लांबल्याने हापूसच्या सुरूवातीच्या हंगामातील पहिला फटका सुमारे २५ ते ३० कोटी रूपयांचा बसण्याची शक्यता अशी माहिती एपीएमसी घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे सुरूवातीच्या हंगामाला किती फटका बसेल ते जानेवारी अखेरच कळू शकणार आहे. कोकणातील मोठ्या शेतकऱ्याला सुमारे १० लाख तर लहान शेतकऱ्याला ५० हजारापासून १० लाखापर्यंत नुकसानाचा फटका केवळ अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बसेल. सुरुवातीच्या हंगामात हापूसला तेजी असते. त्यावेळी निर्यातदार आखाती देशात हापूसची

वारी करत नाहीत. मार्च अखेर आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आखाती देशात हापूसची वारी निर्यातदारांकडून सुरू केली जाते. तीही यंदा लांबणार आहे.शिवाय आंब्यावर थ्रिप्स नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यासाठी दररोज फवारणीचा एक हात फिरवावा लागत आहे. एका फवारणीचा २० एकर बागेचा खर्च हा ५० ते ६५ हजार रुपये येतो. महागाईचा चटका सोसत संकटाला सामोरे जाण्याची वेळ आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आली आहे. सुमारे २२५ हुन अधिक घाऊक व्यापाऱ्यांनी हापूसच्या बागा आगाऊ विकत घेतल्या आहेत. कणी न धरल्याने आणि थ्रिप्स रोगामुळे किती उत्पादन होईल हे आता सांगणे अशक्य असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.

• कोरोनामुळे गेल्या वर्षी उलाढाल १५० कोटींनी घसरली होती. यंदा उलाढाल किती होईल हे आता सांगणे अशक्य असून हंगाम केवळ ५० दिवसांचा झाल्यास त्याचा परिणाम थेट उलाढालीवर होईल. सुमारे ५५० कोटी रुपयांची होणारी उलाढाल ही २०० कोटी रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे.

हापूस उत्पादक शेतकरी कम व्यापारी हे मुंबईसह इतर ठिकाणच्या घाऊक व्यापाऱ्यांना बागा खरेदी करून देतात. त्यासाठी शेतक-यांना ठराविक रक्कम आगाऊ दिली जाते. तो माल बाग खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांकडेच विक्रीसाठी कोडनुसार पाठवला जातो. मुंबईतील सुमारे २५० घाऊक व्यापाऱ्यांनी बागा खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button