Assembly Winter Session : पावसाळी अधिवेशनाचेच भाषण हिवाळी अधिवेशनात रिपिट; अजित पवारांचा आरोप | पुढारी

Assembly Winter Session : पावसाळी अधिवेशनाचेच भाषण हिवाळी अधिवेशनात रिपिट; अजित पवारांचा आरोप

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी (Assembly Winter Session) अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून, आकड्यांची धूळफेक केली. महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले, सुनिल केदार, सुनिल प्रभू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
हिवाळी अधिवेशनाचे (Assembly Winter Session) सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, तीन आठवडे अधिवेशन चालवा, अशी मागणी आम्ही केली पण सरकारने ती नाकारली. आम्ही विरोधक म्हणून जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या बाबतीत कर्नाटकची टीका, सीमावाद संदर्भात सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडले. 4 मंत्र्यांच्या विरोधात आवाज उठविला. विरोधात घोटाळ्यांचे पुरावे दिले. त्यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी सभागृहात आणि बाहेरही संघर्ष केला. पण सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. महापुरूषांच्या अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अंतिम आठवडा प्रस्तावातून सरकारचे लक्ष वेधले. परंतु त्यांनी यासंदर्भात चकार शब्दही काढला नाही.

Assembly Winter Session : पावसाळी अधिवेशनाचेच भाषण रिपिट 

सीमावादावर सत्ताधाऱ्यांकडून कडक संदेश देणारा प्रस्ताव आला नाही. पावसाळी व हिवाळी अधिवेशनात ७८ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. हा सरकारचा आर्थिक शिस्त बिघडविण्याचा प्रकार आहे. त्यांचे बहुमत असल्याने दुर्दैवाने त्या मंजुरही झाल्या. लोकपाल विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही, असा आरोपही या नेत्यांनी केला. अंतिम आठवडा प्रस्ताव हा राज्यातील जनतेसाठी महत्वाचा असतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देताना पावसाळी अधिवेशनाचेच भाषण हिवाळी अधिवेशनात रिपिट केल्याचाही आरोप अजित पवार यांनी केला.
मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देताना जाहीर सभेसारखे उत्तर देतात. त्यांच्यावर सभागृहात नसलेल्यांनी, वृत्तपत्रांनी केलेली टीका सभागृहात मांडण्याची गरज नसते, सहा महिने भरपूर झाले आता तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, असे समजून दिशादर्शक काय ते सांगा, असे आव्हान अजित दादांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
हेही वाचा

Back to top button