Sanjay Raut : प्रश्न पैशांचा नाही, स्वाभिमानाचा! | पुढारी

Sanjay Raut : प्रश्न पैशांचा नाही, स्वाभिमानाचा!

पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सव्वा रुपयाच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत संजय राऊत माझे मित्र असल्याने मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी, असा सल्ला दिला होता.

याच दरम्यान राऊत यांनी, पैशांचा मुद्दा नाही, स्वाभिमानाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दावा एक हजार कोटींचा असो अथवा सव्वा रुपयांचा. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे किंमत वाढविण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असे राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये हे पत्र जसेच्या तसे छापण्यात आले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना पुढील चार दिवसांत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला. लोक ५० कोटी, १०० कोटींचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की राऊतांनी मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सामनात अग्रलेख आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पत्र लिहित उत्तर दिलं होतं. यावरुन राजकीय संघर्ष सुरु आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सोयाबीनचा दर पडला, शेतकरी हवालदिल

Back to top button