मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सव्वा रुपयाच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत माझे मित्र असल्याने मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी, असा चिमटा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काढला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये हे पत्र जसेच्या तसे छापण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना पुढील चार दिवसांत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला. लोक ५० कोटी, १०० कोटींचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की राऊतांनी मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सामनात अग्रलेख आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पत्र लिहित उत्तर दिलं होतं.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जे पत्र लिहिलं होतं; ते सामनाच्या संपादकीयमध्ये जसेच्या तसे छापण्यात आलं आहे.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. नाना पटोले सैरभैर झालेत. राजीव सातव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची अपेक्षा होती, असे पाटील यांनी म्हटले आहे.