दुबई; पुढारी ऑनलाईन : आयपीएलमध्ये बुधवारी रात्री खेळलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा ८ विकेट्स राखून पराभव केला. चार महिन्यानंतर दिल्लीच्या संघात वापसी केलेल्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ४७ धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान, यशस्वी पुनरागमन केल्यानंतर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद गमावल्या प्रकरणी मौन सोडले आहे. याचबरोबर अय्यरने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कामगिरीचे कौतुक केले आहे.
संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आपण आदर करतो. ऋषभ पंत चांगल्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करत आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून पंतने दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी उंचावर नेण्याचा प्रयत्न केला, असे अय्यरने ((Shreyas Iyer) म्हटले आहे.
पंत चांगली कामगिरी करत आहे. त्यासाठी संघ व्यवस्थापनाने संपूर्ण हंगामात पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत आपण संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आदर करतो, असे अय्यर म्हणाला.
गौतम गंभीरने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. अय्यरच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी सुधारली. २०२० मध्ये दिल्लीने पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारली होती.
पण इंग्लंड विरोधात खेळलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे अय्यरला चार महिने टीमपासून दूर रहावे लागले. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कर्णधारपदी नियुक्त केले. सध्या दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात शिखर धवन (४२), श्रेयस अय्यर (नाबाद ४७) व ऋषभ पंत (नाबाद ३५) यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर ८ विकेटस् राखून दणदणीत विजय मिळविला.