वयोमानानुसार शरीर साथ देत नाही हे खरंच. परंतु, जर शरीराला हव्या त्या पोषक गोष्टी मिळाल्या तर शरीर चांगली सोबत करेल. परंतु, त्यासाठी वृद्धापकाळात वृद्ध व्यक्तींंनी काही गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे. रोजच्या जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते.
वय वाढत जाते तसे शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. तारुण्यात वाटणारा उत्साह वृद्धापकाळात नाहीसा होऊन शरीराला जडलेल्या आजारपणाने निरुत्साही वाटायला लागते. थकवा, अशक्तपणा, एकटेपणा जाणवू लागतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन छोटे-मोठे आजार सतत त्रास देत राहतात.
शिवाय मानसिक व्याधीमुळे जगण्यात अजूनच पोकळी निर्माण होते. भूक मंदावणे, पचनसंस्था बिघडणे, दमा, उच्चरक्तदाब, डायबेटीस, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे अशा एक ना अनेक व्याधींनी म्हातारपण भरून जाते. त्यात विनाकारण होणारी चिडचिड, विसराळूपणा, एकट्यात स्वतःशीच बडबडणे, सतत रागराग करणे. स्वाभावातील या बदलामुळे घरातील वातावरणही तणावयुक्त राहते. वयोमानानुसार शरीर साथ देत नाही हे खरंच.
परंतु, जर शरीराला हव्या त्या पोषक गोष्टी मिळाल्या तर शरीर चांगली सोबत करेल. परंतु, त्यासाठी वृद्धापकाळात वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे. रोजच्या जीवनशैलीत पुढील महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते. शरीराची भूक भागली की मानसिक स्वास्थ्य अबाधित राहायला मदत होईल.
हलके अन्न घ्यावे : या वयात पचनसंस्था विस्कळीत झालेली असते. पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, अवेळी, चार चौघात गॅसेसच्या त्रासाने लाजिरवाणी अवस्था होणे. अशा समस्या दूर करण्यासाठी पचायला हलका आहार घ्यावा. तेलकट, मसालेदार, बेकरी पदार्थ टाळावेत. पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश करावा.
थोडे-थोडे खावे : एका वेळी पोट गच्च भरेल एवढे जेवण करू नये. दिवसातून तीन ते चार वेळा थोड्या-थोड्या मात्रेत खावे. एकदाच पोटभर जेवल्याने पोट गच्च होणे, करपट ढेकर येणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे थोडी भूक राखून जेवावे.
संतुलित आहार : पालेभाज्या, फळे, दूध, दही, ताक, अंडी, मांसाहार, मोड आलेली कडधान्ये असा परिपूर्ण संतुलित आहार घ्यावा. संतुलित आहारामुळे आवश्यक ती सगळी पोषक तत्त्वे शरीरास मिळतात आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
पाणी भरपूर पिणे : पचनासंबंधित विकारांवर रामबाण उपाय म्हणजे योग्य मात्रेत, योग्य वेळी पाणी पिणे. मलावष्टंभ, अजीर्ण, अरुची, अपचन, गॅसेस या सगळ्यांसोबत मूळव्याध उद्भवतो. वारंवार उन्हाळी लागणे, पोट दुखणे, लघवी साफ न होणे या समस्या उद्भवतात. या सगळ्या आजारांवर पाणी उत्तम औषध आहे.
– शौचविधी आटोपून ग्लासभर कोमट पाणी प्यावे. जेवताना घोट घोट पाणी प्यावे.
– जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नये. जेवणानंतर पाच ते सहा घोट पाणी प्यावे. नंतर अर्ध्या ते एक तासानंतर भरपूर म्हणजे तहान भागेल एवढे पाणी प्यावे.
– जेवणाच्या वेळेच्या आधी अर्धा तास पाणी पिऊ नये. कारण जेवणाआधी पाणी पिल्यास पोट भरल्याची जाणीव होते आणि भूक मंदावते.
शिवाय नारळपाणी, कलिंगड, काकडी, संत्री, टरबूज अशी पाण्याचे प्रमाण असलेली फळे खावीत.
साखर आणि मीठ कमी करावे : हायब्लडप्रेशर आणि डायबेटीससारखे आजार उतरत्या वयात होणारे आजार आहेत. आहारात आणि साखरेचे अतिप्रमाण या आजारांना वाढवण्यासाठी चालना देतात. म्हणून जेवणात वरून मीठ खाण्याची सवय बंद करावी. जेवण बनवताना त्यात मीठ कमी वापरावे. म्हणजे अळणी जेवण जेवावे. गोड पदार्थांना निरोप द्यावा. चहाचे प्रमाण कमी करावे. जरी कमी साखरेचा किंवा विना साखरेचा चहा घेत असाल तर दिवसातून एकदाच घ्यावा.
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, बी 12 : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी, स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हे त्रास सुरू होतात. अंडी, मांसाहार, दूध आणि संतुलित आहारातून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, प्रोटिन्स शरीरास मिळतात. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 वा बी 12 च्या गोळ्या घ्याव्यात.
लोह : भूक लागत नाही, अरूची निर्माण होते. दिवस दिवस जेवणाची इच्छा होत नाही. सणासुदीचा किंवा आठवड्यातला एखादा वार अशा प्रकारचे उपवास करणे. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. म्हणून सतत थकवा, निरुत्साही, अशक्त वाटणे, चक्कर येणे, उगाचच चिडचिड होणे अशी लक्षणे दिसू लागतात. लोहाचे शरीरातले प्रमाण वाढण्यासाठी गाजर, सफरचंद, केळी, पालक, भेंडी, बीट, दूध, अंडी, मासे, गुळशेंगदाणे लाडू, डिंक लाडू, काळे मनुका, खजूर अशा पदार्थांचे सेवन करावे. वृद्धापकाळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तवाढीच्या गोळ्या वा भूक वाढीचे औषध घ्यावे.
हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे खावीत. फायबरयुक्त आहारामुळे पचनविकार दूर होऊन वजन नियंत्रित राहायला मदत होते. रोज अर्धा किंवा एक तास चाला. योगा, प्राणायाम करा. ताणतणावापासून दूर राहा.
आनंदी राहायचा प्रयत्न करा. छान, आवडीची पुस्तके वाचा. छंद जोपासा. आपला वेळ आवडत्या गोष्टींमध्ये घालवा. नवीन मित्र जोडा. जुन्या मित्रांसोबत बोला. लहान मुलांसोबत वेळ घालवा. यामुळे मन गुंतून राहते आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. म्हातारपण हे बालपणासारखे असते. लहान बाळाला जसं जपले जाते तसंच वृद्ध व्यक्तींना जपावे. त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्यासोबत वेळ घालवावा.