खासदार राहुल शेवाळेंच्या भानगडींची फाईल तयार : अ‍ॅड. रूपाली ठोंबरे-पाटील | पुढारी

खासदार राहुल शेवाळेंच्या भानगडींची फाईल तयार : अ‍ॅड. रूपाली ठोंबरे-पाटील

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : खा. राहुल शेवाळे यांच्या भानगडींची संपूर्ण फाईल तयार असून, आपण ती संबंधित यंत्रणांना लवकरच सोपवणार आहोत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या अ‍ॅड. रूपाली ठोंबरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. त्यावर अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी, ‘राष्ट्रवादीचे संबंध दाऊदशी असल्याचे पुरावे द्या. मगच बोला’, असे आव्हान शेवाळेंना दिले.

शेवाळे यांच्यावर आरोप करणार्‍या पीडितेला मुंबईत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे, असे अ‍ॅड. ठोंबरे-पाटील यांनी सांगितले. या पीडितेच्या वकिलांना मॅनेज करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

त्या फॅशन डिझायनर महिलेचा दाऊद इब्राहिमशी संबंध

खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत संबंधित फॅशन डिझायनर महिलेवरच गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर आरोप करणार्‍या त्या फॅशन डिझायनर महिलेचा कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शेवाळे आणि त्यांच्यावर आरोप करणार्‍या महिलेचा एकत्र असलेला दुबई येथील लिफ्टमधील व्हिडीओ समाजमाध्यम तसेच चॅनल्सवरून सर्वत्र प्रसारित झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे.

बुडत्याचा पाय खोलात

राहुल शेवाळे यांच्या आरोपांना उत्तर देताना खासदार अरविंद सावंत यांनी शेवाळेंचे आरोप म्हणजे बुडत्याचा पाय खोलात, असे म्हटले आहे. चिखलात रुतलेला माणूस हालचाल करतो तेव्हा तो अजून चिखलात जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.

Back to top button