Share Market Updates | सेन्सेक्सची १,१८१ अंकांनी उसळी, गुंतवणूकदारांना ३.६ लाख कोटींचा फायदा, हे ५ घटक ठरले महत्वाचे | पुढारी

Share Market Updates | सेन्सेक्सची १,१८१ अंकांनी उसळी, गुंतवणूकदारांना ३.६ लाख कोटींचा फायदा, हे ५ घटक ठरले महत्वाचे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Share Market Updates- अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचा वेग कमी करेल या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि.११) अमेरिकेसह आशियाई शेअर बाजारात तेजी आली. बीएसई सेन्सेक्स १,१८१ अंकांनी वाढून ६१,७९५ वर बंद झाला तर निफ्टी ३२१ अंकांनी वाढून १८,३४९ वर बंद झाला. निफ्टीने ५२ आठवड्यातील उच्चांक गाठत १८,३०० वर व्यवहार केला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ३.६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. तसेच BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून २८५.२१ लाख कोटींवर पोहोचले.

अमेरिकेतील महागाई दर नियंत्रणात

ऑक्टोबरमधील अमेरिकेतील किरकोळ महागाई दर ७.७ टक्के इतका राहिला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये तो ८.२ टक्क्यांवर गेला होता. तर ऑगस्टमध्ये ८.३ टक्के होता. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील महागाई दर ४० वर्षातील उच्चांकी पातळीवर गेला होता.

व्याजदर वाढीचा वेग कमी होण्याची अपेक्षा

वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली होती. आता महागाई कमी झाल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचा वेग कमी करेल या अपेक्षेने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये तेजी आली. डाऊ जोन्स निर्देशांक ३.७ टक्क्यांनी वाढला. एस अँड पी ५०० हा ५.५४ टक्क्यांनी वधारला. नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) ७.३५ टक्क्यांची वाढ नोंदवली.

आशियाई बाजारातही तेजी

जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांपेक्षा अधिक वधारला. तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीने ३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्सने २९९ अंकांनी म्हणजेच १.६५ टक्क्यांनी वधारून १८,३९६ वर व्यवहार केला.

डॉलर कमजोर, रुपयात सुधारणा

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ६४ पैशांनी वाढून ८०.७६ वर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची घसरण सुरु होती. आता त्यात सुधारणा झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपया १ टक्क्याने वधारला आहे. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच रुपया ८०.८ वर व्यवहार करत आहे. दरम्यान, डॉलर निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरून १०७ वर आला.

FII कडून खरेदीचा ओघ वाढला

रुपया मजबूत होत असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) गेल्या २-३ आठवड्यांपासून भारतीय समभागांच्या खरेदीचा ओघ वाढला आहे. NSDL डेटानुसार नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत FII ने शेअर बाजारात १९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गुरुवारच्या घसरणीनंतर आज शुक्रवारी (दि.११) शेअर बाजार सावरला. जागतिक संकेत सकारात्मक असून आशियाई शेअर बाजारांनी उच्च पातळीवर जाऊन व्यवहार केला. तसेच अमेरिकेतील शेअर्स झपाट्याने वाढले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक ट्रेंड आला. शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली तेजी बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली आहे. सेन्सेक्क १,१८१ अंकांनी म्हणजेच १.९० टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे आज सेन्सेक्सने ६१,७०० चा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीने ३२१ अंकांनी उसळी घेतली आहे. निफ्टीवरील आजची वाढ ही १.७२ टक्क्यांनी आहे.

हे शेअर्स वधारले

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, हिंदाल्को यांचे शेअर्स आघाडीवर होते. एचडीएफसीचा शेअर ७.११ टक्क्यांनी वाढून २,६८३ रुपयांवर गेला. HDFC बँकेने ५.८३ टक्क्यांनी उसळी घेत १,६१४.१५ वर व्यवहार केला. झोमॅटोचे शेअर्स ७.९७ टक्क्यांनी वाढून ६९.०५ रुपयांवर गेले. बीएसईवर १,९६३ शेअर्स वाढताना दिसले तर १,२४० शेअर्स घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात आयशर मोटर्स आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली. (Share Market Updates)
काल गुरुवारी सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरून ६०,६१३ वर बंद झाला होता. तर निफ्टी १२८ अंकांनी खाली येऊन १८,०२८ वर बंद झाला होता. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतासह आशियाई बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली होती. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३३ पैशांनी घसरून ८१.८० वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button