तेलंगणात विकण्यापूर्वीच लहानग्या फातिमाची सुटका | पुढारी

तेलंगणात विकण्यापूर्वीच लहानग्या फातिमाची सुटका

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी आझाद मैदान येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना ताजी असताना तीन दिवसांपूर्वी सांताक्रुज येथून झालेल्या एक वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश करण्यात वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. सोलापूर रेल्वे स्थानकातून दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून
या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली.

शरीफा ऊर्फ काजल अलीम शेख आणि सुजातादेवी उपेंद्र पासवान अशी या दोघींची नावे असून त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सांताक्रूझहून पळवलेल्या मुलीला तेलंगणात विकण्याचा दोघींचा डाव होता. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. 24 वर्षांची मुस्कान अदनान शेख ही महिला दोन वर्षांपासून सांताक्रुजला जुहू-तारा रोडच्या एसएनडीटी बसस्टॉपसमोरील फुटपाथवर तिचे आई-वडील, चार भाऊ आणि एक वर्षांची मुलगी फातिमासोबत राहते. ती वडिलांसोबत सांताक्रुज रेल्वे स्थानक आणि गजधरबांध परिसरात प्लास्टिक गोळा करण्याचे काम करते. तिचा पती सांताक्रुज, धारावी, माहीम परिसरात भीक मागतो. आई आजारी असल्याने ती मुलीसह तिच्या भावांचा सांभाळ करते.

30 ऑक्टोबरला रात्री मुलीला आईकडे सोपवून मुस्कान प्लास्टिक गोळा करण्यासाठी गेली. त्या रात्री छटपूजेला चौपाटीकडे आणि चौपाटीवरुन रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या लोकांची प्रचंड गर्दी होती. रात्री एक वाजता ती काम संपवून एसएनडीटीजवळ आली होती. यावेळी तिला तिची आई आणि भाऊ तिथे झोपलेले दिसले. मात्र फातिमा कुठेच दिसली नाही. तिने पोलिसांना घडला प्रकार सांगितला.

पोलिसांसोबत गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन महिला फातिमाला घेऊन जात असल्याचे दिसले होते. या महिला मुंबईहून हैद्राबाद आणि हैद्राबाद येथून सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाल्याचे समजले.

प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्यासह पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे, उपनिरीक्षक स्नेहल पाटील, शार्दुल बनसोडे व अन्य पोलीस पथकाने सोलापूर आरपीएफ पोलिसांच्या मदतीने या दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांच्या तावडीतून पोलिसांनी फातिमाची सुखरुप सुटका केली.

Back to top button