मुंबई : केईएममध्ये स्लॅब कोसळले!; नर्स जखमी | पुढारी

मुंबई : केईएममध्ये स्लॅब कोसळले!; नर्स जखमी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई पालिकेच्या परळ येथील के. ई. एम. हॉस्पिटलच्या आवारातील नर्सेस सेवा निवासस्थान धोकादायक बनली आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खोलीमधील स्लॅब कोसळून जेवण बनवत असलेल्या योगिता चव्हाण (40) या नर्स किरकोळ जखमी झाल्या. त्यांची अन्यत्र तात्पुरती व्यवस्था केली आहे.

के ई. एम. हॉस्पिटलमधील नर्सेस सेवानिवासस्थान1926 मध्ये बांधण्यात आली होती. सुमारे 96 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतींची डागडुजी अधूनमधून केली जात होती. पण गेल्या काही वर्षापासून या निवासस्थानाची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारती धोकादायक बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका खोलीमधील स्लॅबसह पंख्यापासून काही नर्सेस जखमी झाल्या होत्या.
गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक एक स्लॅब कोसळला. त्यावेळी योगिता चव्हाण या जेवण बनवत होत्या. त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या दुर्घटनेनंतर तातडीने स्थानिक माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी के. ई. एम. हॉस्पिटलला भेट देऊन, दुर्घटनेची पाहणी केली. नर्सेस सेवानिवासस्थान धोकादायक बनल्याचे प्रशासनाला अनेकदा सांगूनही त्यांच्याकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप
यावेळी कोकीळ यांनी केला के. ई. एम. हॉस्पिटलच्या आवारातील नर्सिंग सेवा निवासस्थानाची होणारी पडझड लक्षात घेऊन,
दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केईएम हॉस्पिटलच्या आवारात नर्सिंग व अन्य शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या मुला मुलींसाठी वस्तीगृह इमारत आहे. तीन मजली असलेल्या या इमारतीचे अलीकडेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यात ही इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. परंतु सल्लागारांनी या इमारतीची दुरुस्ती केल्यास त्यांचे आयुर्मान दहा ते बारा वर्षांनी वाढू शकेल, असा अहवाल दिला. त्यानुसार पालिकेने या इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button