एकाच मेळाव्याची दुसरी गोष्ट | पुढारी

एकाच मेळाव्याची दुसरी गोष्ट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : तोच पक्ष… तोच झेंडा… तीच निशाणी… गाणीही तीच… आणि घोषणाही त्याच. फरक इतकाच की फक्त नेते आणि कार्यकर्ते दुभंगलेले. एकाच मेळाव्याची दोन नावे. एक एकनिष्ठांचा मेळावा तर दुसरा विचारांचा. ही अजब स्थिती होती शिवसेनेच्या दोन गटात दुभंगलेल्या शिवाजी पार्कवरी ठाकरे गटाच्या आणि बीकेसी मैदानावरील शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याची.

शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडले. दोन्ही गटांनी आपली शक्ती दाखवली. त्यामुळे मुंबईत दसर्‍याच्या दिवशी यंदा कित्येक वर्षांनी कधी नव्हे तेवढे रस्ते जाम झाले होते. चारचाकी वाहने खासगी बस, बाईक्स आणि प्रथमच एसटीच्या खचाखच भरलेल्या गाड्या शिवाजी पार्क आणि बीकेसीच्या दिशेने धावत होत्या. रस्ते वाहतूक जाम तर बोट शिरायलाही जागा नाही अशी लोकलची स्थिती. अख्या मुंबईची कोंडी झाली.

शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे राज्याच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत धडकत होते. विविध जाती धर्माच्याच नव्हे तर परप्रांतातीलही काहींचा यात भरणा होता. ‘चलो बंबई घुमने जाना हृै… फ्री मे… खानापिना सब मिलेगा… उपरसे पैसा भी…असे सांगून ही गर्दी जमवली गेली. बांधकाम मजुरांनाही सोडले नाही. आपण कोणाच्या सभेला जातोय हेही बिच्चार्‍यांना माहित नव्हते. सकाळी लवकर मुंबईत पोहोचलेल्या या कार्यकर्त्यांनी दादर चौपाटी बॅण्ड स्टँड पासून ते थेट सीएसएमटी स्टेशन पाहण्याची हौस भागवून घेतली.

कुठे शिवसेना झिंदाबाद तर कुठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असोच्या घोषणा. तब्बल 56 वर्षे गळ्यात गळे घालून शिवाजी पार्कवर येणारा शिवसैनिकही दोन मेळाव्यांत विभागला गेला होता. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी धावपळ सुरू होती राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत होते. हळूहळू दोन्हीकडे गर्दी वाढत होती. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी तर खास डीजे आणला होता. मुंबईत आतापर्यंत असा डीजे वाजलाच नाही असा त्याचा दावा होता. दोन्ही ठिकाणी खाण्यापिण्याची जंगी व्यवस्था. व्हीआयपींसाठी तर वेगळी खास जेवणाची व्यवस्था होती. हजारो कार्यकर्त्यांसाठी वडापाव बनवले गेले होते. शिंदे गटाने तर व्हीआयपी साठी दीडशे रुपये किमतीची कॉफीची व्यवस्था केली होती. जेवणासाठी तर तीन स्वतंत्र विभाग होते. सभास्थळी पाण्याच्या बाटल्यांचे तर ढीग पडले होते.

कोल्हापूरहून आलेल्या शिवसैनिकांनी एक अजब किस्सा ऐकवला. सभेच्या आधी साधारणपणे चारच्या सुमारास हे सगळे शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले. त्यांनी आपल्या भागातील शिवसैनिकाला फोन लावला. त्यांच्यातील संभाषण या शिवसैनिकांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना ऐकवले. बीकेसीवरील सभेला येण्यासाठी एक हजार रुपये दिल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला. त्याची व्हीडिओ क्लिपही या शिवसैनिकांनी वाजवून दाखवली. दुसरीकडे भाजपचे निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. चलो शिवाजी पार्क, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीची टोपी घातलेला एक फोटो शेअर केला. मनासारखी गर्दी दोन्ही मेळाव्यात झाली. पण सामान्य मुंबईकराला मात्र, याची झळ पोहचली. वृत्तवाहिन्यांवरील गदीर्ची दुश्य पाहून मुंबईकरांनी घराबाहेर पडायचेच टाळले. दसरा घरच्या गरी एन्जॉय केला. कोणत्याही क्षणी काहीही घडेल अशी स्फोटक स्थिती असताना मुंबई पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत परिस्थिती उत्तम हाताळली. कुठेही गालबोट लागू दिले नाही. अर्थात कार्यकत्यार्ंनीही तेवढाच संयम दाखवला आणि एकाच शकलातून निमार्ण झाले दोन्ही मेळावे गदीर्चा उच्चांक मोडीत उत्साहात पार पडले.

Back to top button