‘धनुष्यबाण’वर ७ ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता! उद्धव-शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश | पुढारी

'धनुष्यबाण'वर ७ ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता! उद्धव-शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. अशातच राज्यातील उद्धव आणि शिंदे गटातील ‘धनुष्यबाण’ चिन्हासंबंधीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचदिवशी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कुठल्या गटाला मिळणार? याचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यांच्या या मागणीच्या आधारे आयोगाने शिंदे गटाला नोटीस बजावत सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाकडूनही प्राथमिक कागदपत्रे सादर केले जाणार असल्याचे कळतेय.

निवडणूक चिन्हासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडे कायम राहिले तर शिंदे गट आव्हान देणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाने याबाबत कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केल्याची तसेच कायदा सेलची बैठक घेऊन, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत किंवा काय करता येईल? याबाबत चाचपणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशात निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवणार की त्यावर कुठल्या गटाचा अधिकार सांगणार? हे महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारी पहिली पोटनिवडणूक आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली. नियमानुसार सहा महिन्यात ही निवडणूक होणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button