राष्ट्रीय स्पर्धा २०२२ : ज्‍युनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांशने उघडले महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे खाते | पुढारी

राष्ट्रीय स्पर्धा २०२२ : ज्‍युनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांशने उघडले महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे खाते

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने आज (शुक्रवार) 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांशने फायनल मध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला.

महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांश पाटीलने पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर करत फायनल गाठली होती. यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता. हाच विश्वास सार्थकी लावत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आगामी कैरो येथील आयोजित व चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यातून त्याला आपली लय कायम ठेवत नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे वेध घेता आला.

रुद्रांशची कामगिरी कौतुकास्पद

महाराष्ट्राचा युवा खेळाडू रुद्रांश पाटीलने फायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याचीही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांनी रुद्रांश याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

रुद्रांशचे सोनेरी यश अभिमानास्पद

महाराष्ट्र संघातील आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांश पाटील याने सुवर्णपदक जिंकण्याची केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. त्याचे हे यश खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी करत तो स्वतःची क्षमता सिद्ध करत आहे. दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला, अशा शब्दांत संघटनेच्या जनरल सेक्रेटरी शीला यांनी रुद्रांशचे खास कौतुक केले.

हेही वाचा :  

Back to top button