मुंबई : अशोक गावडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला पितृपक्षाचे विघ्न; नगरसेवक तळ्यात मळ्यात | पुढारी

मुंबई : अशोक गावडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला पितृपक्षाचे विघ्न; नगरसेवक तळ्यात मळ्यात

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अंतर्गत वादामुळे 5 नगरसेवकांसह शिंदे गटात पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (१० सप्टेंबर) पक्षप्रवेश करण्याचे निश्चित झाले होते. परंतु 5 नगरसेवकांमधील फाटाफूट, एका नगरसेवकाच्या घरातील दुःखद घटना आणि पितृपक्षाच्या विघ्नामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश पुढे ढकलला आहे. आगामी काळात त्या 5 पैकी 4 नगरसेवकांना गळती लागण्याची दाट शक्यता असल्याने केवळ लेकीसह बापाला दसऱ्याच्या मुहूर्तावर पक्षप्रवेश करण्याची वेळ येणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून कळते.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतल्यावर पक्षप्रवेशासाठी साकडे घातले. शनिवारी (दि.10 )पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला होता. परंतु सध्या त्यांच्याबरोबर पक्षप्रवेश करणाऱ्या त्या कथित 5 नगरसेवकांपैकी अन्य 4 नगरसेवक प्रवेशासाठी आत्ता इच्छुक नसल्याचे समजते. त्यातच एका माजी नगरसेवकाच्या घरी दुःखद घटना घडली आहे. तसेच पितृ पंधरवाडा सुरू झाल्याने या काळात शुभ कार्याला आरंभ करत नाही. विशेष म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर रोजी विद्यमान सरकारच्या सत्ता स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. यामुळे 27 तारखेनंतर सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल लागतो त्यानंतरच पुढचे सावध पाऊल टाकणार असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याचे समजते. गमतीचा भाग म्हणजे 2 नगरसेवक भाजपाच्या गळाला लागले आहेत. तर 2 राष्ट्रवादी सोबतच दिल्या घरी सुखाने संसार करणार आहेत. आणि उर्वरित शिंदे गटाकडे झुकलेल्या दोन नगरसेवकांचा मुहूर्त दसऱ्याला होणार आहे. त्यामुळे या नव्या समीकरणामुळे ” आधे इधर जाओ ,आधे उधर जाओ और बाकी हमारे पीछे आओ ” अशी या नगरसेवकांची तर्‍हा झाल्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी 52 पैकी 46 नगरसेवक बरोबर घेऊन राष्ट्रवादीला भले मोठे भगदाड पाडले. अशा स्थितीत उरलेल्या 6 नगरसेवकांच्या ताकदीवर अशोक गावडे यांनी नवी मुंबई राष्ट्रवादीची सक्षमपणे खिंड लढवली. याशिवाय गावडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 50 हजारांची मते खेचण्याकडे त्यांचा बेलापूर मतदारसंघात अश्व उधळत होता. एकेकाळी शरद पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले गावडे यांची एकाकी झुंज भाजप आणि शिंदे सेनेने हेरली. या घडामोडीत माजी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांमध्ये वारंवार खटके उडत होते. याचा लाभ उठवत शिंदे गटाच्या शिलेदारांनी गावडे यांच्यावर आश्वासक प्रकल्पांची जाळी टाकल्याची खुमासदार चर्चा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांच्या कानोकानी पोहोचली . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने तडकाफडकी गावडे यांच्या ऐवजी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांची रातोरात जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली. त्यामुळे गावडे यांच्यापुढे शिंदे गटात जाण्याचा रस्ता अजूनच खुला झाला. मुख्यमंत्री हे आपणास सहज भेटू शकतात याशिवाय सत्ताधारी असल्याने विविध विकास कामे मार्गी लावता येईल या उद्देशाने गावडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाला पसंती दिली असल्याचे सांगतात. परंतु आता त्यांचा पक्षप्रवेश रखडल्याने कार्यकर्ते देखील हवालदील असल्याने आज त्यांची परिस्थिती तळ्यात ,मळ्यात अशी झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार पुन्हा अशोक गावडे यांचे मन वळविण्यात यशस्वी होतात का? अशी एक शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री यांचा अद्यापही पक्षाचा निकाल अधांतरीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणे म्हणजेच राजकीय कारकीर्द संपविणे. अशा अर्थाचा धोक्याचा इशारा राष्ट्रवादीतर्फे नगरसेवकांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 4 नगरसेवकांना राष्ट्रवादीने आडकाठी केल्याची एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गावडे आता कोणता झेंडा हाती घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

हेही वाचा

Back to top button